मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवीन परीक्षा प्रणाली 2024 ऐवजी 2025 पासून लागू करावी, या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात सुमारे 39 तास आंदोलन केले. या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून हे आंदोलन मागे घ्यायला लावले. तसेच विद्यार्थ्यांची एक समिती करून या समिती सोबत शरद पवार स्वतः मुख्यमंत्र्यांना या प्रश्न भेटतील, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. मात्र शरद पवार यांच्या या शिष्टाईबाबत भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे.
पवारांनी नौटंकी थांबवावी : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत 80 वर्षाचा एक योद्धा रणांगणात उतरला आहे, अशा पद्धतीचे चित्र पुण्यात निर्माण करण्यात आले. वास्तविक केवळ राजकीय विरोधासाठी आणि सरकारच्या विरोधात काहीतरी मुद्दा हवा, म्हणून शरद पवार या आंदोलनात उतरले आहेत. शरद पवार यांनी केलेली ही केवळ नौटंकी आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. पवारांना जर प्रश्न सोडवायचे असते तर त्यांनी यापूर्वीच अनेक प्रश्नांमध्ये लक्ष घातले असते.
विरोधाचे राजकारण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये लक्ष : राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कधीही पवार थेट भिडताना दिसत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला. एसटी कर्मचारी त्यांच्या घरापर्यंत धडकले. त्यावेळी ही शरद पवार यांनी त्यांच्या प्रश्नांमध्ये कोणतेही लक्ष घातले नाही. राज्यातील कष्टकऱ्यांचे कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे शरद पवार कधीही लक्ष घालत नाहीत, मात्र आता केवळ सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी आणि विरोधाचे राजकारण करण्यासाठी शरद पवार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये लक्ष घालत आहेत. शरद पवार यांनी किमान आपल्या वयाचे भान बाळगून तरी अशा पद्धतीची नौटंकी थांबवावी, अशी परखड प्रतिक्रिया दरेकर यांनी व्यक्त केली आहे.
पवारांनी आंदोलन संपवले : एमपीएससीच्या नवीन अभ्यासक्रमाचे 2025 पासूनचे परिपत्रक काढा, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. एमपीएससीचे विद्यार्थी पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये उपोषणाला बसले होते. यामध्ये उपोषण करणाऱ्यांची तब्येत सुद्धा खालावली होती. परंतु सरकारकडून मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, अशी मागणी या विद्यार्थ्यांची होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू असलेल्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधून पवारांनी आंदोलन संपवलेले आहे.