मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या टीकेला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'ते' बावनकुळे नसून बावनखुळे आहेत, असे टीकास्त्र अरविंद सावंत बावनकुळे यांच्यावर सोडले. त्यांनतर त्यांच्या टीकेला आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यापुढे जर अशी टीका केली तर, तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही अशा इशारा प्रसाद लाड यांनी सावंत यांना दिला आहे.
बावनकुळे नाही बावनखुळे : उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना विदर्भातील जनतेची आठवण कधी झाली नाही. मात्र, आता त्यांना विदर्भाचा पुळका आलेला आहे. परंतु त्यांची राजकीय नौटंकी जनता ओळखून असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार, नेते अरविंद सावंत यांनी बावनकुळे यांचा बावनखुळे असा उल्लेख केला होता. ते बावनकुळे नसून बावनखुळे आहेत अशी टीका अरविंद सावंत यांनी केली होती. त्यावर भाजप नेते आमदार प्रसाद लाड प्रतिक्रिया दिली आहे.
यापुढे एकेरी उल्लेख : याविषयी बोलताना भाजप नेते, आमदार प्रसाद लाड म्हणाले की, कालपर्यंत झोपी गेलेले, घरी बसलेले अचानक जागे झाले आहेत. ते आता दौऱ्यावर निघाले आहेत. म्हणतात ना उथळत्या पाण्याला खळखळाट फार, अशी परिस्थिती अरविंद सावंत यांची झाली आहे. तुम्ही बावनकुळे यांच्याविषयी बोलताना तोंड सांभाळून बोला अशी माझी विनंती आहे. तुमचा तर खुळखुळाच झालेला आहे. पोपट मेला, पोपट मेला म्हणून ओरड करत होता. तो तुमचा बॉस नावाचा पोपट मरायला आला आहे. म्हणून तो आता घरातून बाहेर पडला आहे, असा हल्लाबोलही प्रसाद लाड यांनी केला.
सावंताना दिला दम : अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना घरातून बाहेर पडले नाहीत. जनतेमध्ये फिरले नाहीत. मानेला पट्टी लावून फिरलात. आता तुम्ही आम्हाला सांगत आहात की, आम्ही बाहेर पडलो, तुम्ही म्हणता बावनकुळे महाराष्ट्राचे नेतृत्व आहेत. बावनकुळे महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख आहेत. म्हणून अरविंद सावंत आतापर्यंत मी तुम्हाला साहेब म्हणतो. पण, यापुढे जर अशी चूक केली तर, तुमचा एकेरी उल्लेख करून तुमचे कपडे फाडल्याशिवाय मी राहणार नाही, असा सज्जड इशारा आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे.