मुंबई - खासदार संजय राऊत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवीची माफी मागावी असे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पोहरादेवीच्या विकासाचा २५ कोटींचा निधी थांबवल्याचं सांगितलं आहे. मुंबईत ते बोलत होते.
मंजूर निधीला स्थगिती - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पोहरादेवीची खोटी शपथ घेतली, म्हणून त्यांनी पोहरादेवीची माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीवर भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. पोहरा देवीची माफी नेमकी कोणी मागायची? हे संजय राऊत यांना सांगायला पाहिजे, असं सांगत २८ नोव्हेंबर २०१९ ला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. व लगेच काही दिवसांनी म्हणजे ४ डिसेंबर २०१९ ला पोहरादेवीच्या यात्रेच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर झालेला असताना त्याला स्थगिती दिली. म्हणून पोहरादेवी व त्याचबरोबर त्या समाजाची माफी उद्धव ठाकरे यांनी मागायला हवी, असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
शपथा व खोटी आश्वासन - यासोबत नितेश राणे यांनी एक व्हिडिओ सुद्धा ट्विट केला आहे. हा जुना व्हिडिओ असून यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवीचा प्रसाद दिला जात आहे. परंतु ते तो प्रसाद खाण्यास नकार देतात व तो प्रसाद आपल्या बॉडीगार्डला देत आहेत, अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे. यावर सुद्धा नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आता पोहरा देवीच्या महंतांनी व त्या समाजाने उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहायचं का? याचे उत्तर आता महंतांनी द्यायला हवं. उगाच देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यापेक्षा खोट्या शपथा व खोटी आश्वासन देणारे हे उद्धव ठाकरे आहेत असेही नितेश राणे म्हणाले आहेत.
ईडी ची कारवाई योग्य की अयोग्य? - काँग्रेस नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना ईडी ला काही पुरावे भेटल्याशिवाय ईडी कधी चौकशी करत नाही असं म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यावर नितेश राणे यांनी संजय राऊत यांची पत्राचाळ प्रकरणी सुरू असलेली चौकशी योग्य की अयोग्य याचा उत्तर आता संजय राऊत यांनी द्यावे, असं म्हटलं आहे.
राज ठाकरे उत्तम मिमिक्री करतात - कोकण दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री करत नक्कल केली. याविषयी बोलताना नितेश राणे म्हणाले आहेत की राज ठाकरे उत्तम मिमिक्री करतात. आता त्यांना त्याची सवय झाली आहे. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे मिमिक्री करायचे, आता राज ठाकरे करतात. त्यामुळे त्याचं काही वाटत नाही, असे सांगत राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे.
हेही वाचा -