मुंबई - नागपूर, धुळे, नंदुरबार, पालघर, वाशिम आणि अकोला या ६ जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यामध्ये विदर्भात भाजपने प्रतिष्ठेची केलल्या नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल धक्कादायक आला असून भाजपचा दारुण पराभव झाला आहे. ज्या नागपुरात भाजपचे दिग्गज नेते आहेत, जो भाजपचा गड मानला जात होता त्याच गडात भाजपचा मानहानीकारक पराभव झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे धुळ्याची सत्ता खेचून आणण्यात भाजपला यश आलं आहे. पालघरमध्ये शिवसेनेने मुसंडी मारली आहे.
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेने आता भाजपच्या गडालाचा सुरूंग लावला आहे. राज्यातील ६ जिल्हा परिषदेमध्ये धुळे वगळता इतर पाचही जिल्हा परिषदेमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या जोरावर हुरळून गेलेल्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचा जनादेश मागितला. मात्र, त्यावेळी पवारांचे राजकारण संपले असे सांगणाऱ्या नेत्यांना पवारांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावत महाविकास आघाडीची मोट बांधून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. शेवटी भाजपला जास्त जागा मिळाल्या असतानाही माजी मुख्यमंत्री फडणवीसांना विरोधी बाकावर बसावे लागले.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जुळलेले गणित आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजपला डोईजड जात आहे. राज्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमध्ये महाविकास आघाडीच्या फॅक्टरमुळे भाजपला सत्ता काही जिल्हा परिषदेतून गमवावी लागली. तर आज निकाल लागलेल्या ६ जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीतही भाजपला ५ ठिकाणी दारून पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. राज्यातून सत्ता गेल्यानंतर स्थानिक स्वराज्या संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात जोर लावला होता. मात्र, धुळे जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्याखेरीज भाजपच्या हाती फारसे यश आले नाही.
नागपूर जिल्हा परिषदेत तर निवडणूक प्रचारासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, फडणवीस यांनी प्रचारांचा झंझावात केला. मात्र, ज्या नागपूरला भाजपचा गड समजला जातो, त्याच गडात भाजपचा दारूण पराभव झाल्याने, भाजपच्या पतनाला सुरुवात झाली असल्याची टीका आता राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे. तसेच नागपूर जिल्हा परिषद निवडणूक वारंवार पुढे ढकलली जात होती. भाजप निवडणुकीला टाळत होती. मात्र आज निवडणूक झाली. जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. विदर्भात भाजपचा आज पराभव झाला आहे. ज्या नागपुरात भाजपचे दिग्गज नेते आहेत, जिथे भाजपची चांगली कमांड होती, आज त्याच नागपुरात भाजपचा पराभव झाल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
गडकरींच्या गावातही भाजप उमेदवार पराभूत-
नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाडा गावात देखील भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रस ३१ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
राज्यातील ६ जिल्हा परिषदेचे निकालाचे आतापर्यंतची आकडेवारी पाहिली असता, नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे. या ठिकाणी नाना पटोले आणि गृहमंत्री अनिल देशमुखांचा प्रभाव दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यातील जनेतेने भाजपला नाकरले असल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. तर नंदुरबार जिल्ह्या परिषदेतही काँग्रेसने-राष्ट्रवादी-शिवसेना मिळून जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू शकते. या ठिकाणीही भाजपला अपेक्षित मिळाले नाही.
आज जाहीर झालेल्या निकालात धुळे जिल्हा परिषदेत भाजपने जोरदार मुसंडी मारत 56 पैकी 39 जागा जिंकून जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवला आहे. या ठिकाणी भाजप - 39, राष्ट्रवादी - 3, काँग्रेस -7, शिवसेना - 4 तर अपक्ष - 03 अशा जागा मिळाल्या आहेत.
अकोला जिल्हा परिषदेतही भारिप बहुजन महासंघाने मुसंडी मारली आहे. या ठिकाणीही भाजपला मोठा शह बसला आहे. मात्र, महाविकास आघाडीला म्हणावे तसे यश संपादन करता आले नाही. दुसरीकडे वाशिममध्येही महाविकास आघाडीने विजयी घौडदौड कायम ठेवली असून या ठिकाणी राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला केवळ ७ जागांवर विजय मिळाला आहे
पालघर जिल्हा परिषद निकाल :
पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत 57 पैकी 18 जागा मिळवत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या ठिकाणीही भाजपला फटका बसला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला 14, भाजप 12, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 5 , बहुजन विकास आघाडी 4 , अपक्ष 3, तर काँग्रेस ला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
सहा जिल्हा परिषदांमधील एकूण जागा ३३२
नागपूर जिल्हा परिषद निकाल:
एकूण जागा - ५८, भाजप - १५, काँग्रेस - ३०, राष्ट्रवादी - १०, शिवसेना -१, अन्य - २
पालघर जिल्हा परिषद निकाल:
एकूण जागा - ५७
भाजप - १२, माकप - ५, काँग्रेस - १,राष्ट्रवादी - १४, शिवसेना -१८, वंचित - ४, अपक्ष - ३
वाशिम जिल्हा परिषद निकाल:
एकूण जागा - ५२
भाजप - ७, काँग्रेस - ९, राष्ट्रवादी - १२, शिवसेना -६, अन्य - १५, अपक्ष - ३
नंदुरबार जिल्हा परिषद निकाल:
एकूण जागा - ५६
भाजप - २३, काँग्रेस - २३, राष्ट्रवादी - ३, शिवसेना - ७
अकोला जिल्हा परिषद निकाल:
एकूण जागा - ५३
भाजप - ७, काँग्रेस - ३, राष्ट्रवादी - ४, शिवसेना -१३, अपक्ष - ४, अन्य - २२ (वंचित आघाडीसह)
धुळे जिल्हा परिषद निकाल:
एकूण जागा - ५६
भाजप - ३९, काँग्रेस - ७, राष्ट्रवादी - ३, शिवसेना -४, अपक्ष - ३