मुंबई : भारतीय जनता पक्षाने 2014 च्या निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर 2019 च्या निवडणुकांमध्ये त्याची पुनरावृत्ती करीत आणखी मोठे बहुमत प्राप्त केले. मात्र आता मोदी लाट ओसरत असल्याने आणि जनतेमध्ये तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काही प्रमाणात भाजपची पीछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष ठसवण्यासाठी पक्षाच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली आहे.
कोणते असतील मुद्दे? : गेल्या दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने राम मंदिर, हिंदुत्व आणि काश्मीरमधील 370 कलम हटवणे या मुद्द्यांच्या आधारे प्रचार केला होता. मात्र आता जनता या मुद्द्यांच्या पलीकडे गेली आहे. भारतीय जनता पक्षाने राम मंदिर उभारण्यास सुरुवात केली आहे. तर 370 कलम हटवले आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील हे प्रश्न आता संपले आहेत. भारतीय जनता पक्षावर त्यामुळे जनतेचा अधिक विश्वास बसला आहे. जो मतदार घरातून बाहेर पडत नव्हता तो मतदार आता भारतीय जनता पक्षासाठी स्वतःहून मत द्यायला पुढे येत आहे. हे भारतीय जनता पक्षाचे गेल्या नऊ वर्षातील यश आहे. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये प्रचारात राम मंदिर हिंदुत्व किंवा काश्मीरमधील 370 हटवणे यासारखे मुद्दे असणार नाहीत.
भाजप 80 कोटी जनेतेपर्यंत पोहचणार : गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने जनतेसाठी नेमकी कोणती कामे केली आहेत. त्याचा लाभार्थ्यांना कसा फायदा झाला आहे. 80 कोटी जनतेपर्यंत आम्ही कसे पोहोचलो आहोत, आणि त्यांना कसा अन्नधान्याच्या माध्यमातून दिलासा मिळाला आहे. त्यांच्या घरातील चूल कशी पेटली आहे. हेच जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. त्यासाठीच आम्ही देशभरामध्ये गेल्या नऊ वर्षात केलेल्या कार्याची उजळणी करीत आहोत याच आधारावर आम्ही आगामी लोकसभा निवडणुकासाठी लोकांसमोर जाणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
आता युट्युब आणि पॉडकास्टवर : भारतीय जनता पक्षाने सोशल मीडियावर अत्यंत प्रभावी प्रचार केल्यामुळे भारतीय जनता पक्षाला यश प्राप्त झाले. हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये स्पष्ट झाले आहेच. मात्र आता आमचे विरोधकही या क्षेत्रामध्ये आघाडीवर असून त्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्हाला आता त्या पुढे जाऊन विचार करावा लागेल. त्यासाठी आम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर याच्या पुढे जाऊन आता युट्युब आणि पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.
एक महिना जनतेशी संवाद : 30 मे ते 30 जून या कालावधीत देशभरामध्ये अनेक ठिकाणी महा जनसंपर्क अभियान आम्ही राबवत आहोत. यामध्ये गेल्या नऊ वर्षातील लाभार्थ्यांची प्रत्यक्ष संवाद बुद्धिजीवी लोकांचे संमेलन आणि गेल्या अनेक वर्षांपासून जनसंघाच्या माध्यमातून काम करणाऱ्या वरिष्ठ कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर पद्म पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध खेळाडू, अन्य महत्त्वाचे पुरस्कार विजेत्या सुमारे साडेपाच जन्मान्य लोकांशी संपर्कसे समर्थन या कार्यक्रमांतर्गत संवाद साधणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.
महा जनसंपर्क अभियानाद्वारे सभा : महाजनसंपर्क अभियानाद्वारे देशभरात विविध बारा ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोठ्या सभा घेण्यात येणार आहेत. याशिवाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी या नेत्यांच्या सर्वांची ही आयोजन केले जाणार आहे.
दहा लाख बूथशी ऑनलाइन संवाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील दहा लाख बूथ सोबत ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यासाठी संपूर्ण देशभरात आम्ही दहा लाख ऑनलाईन बुथ प्रमुख ही नेमले असून त्यांच्या माध्यमातून अन्य कार्यकर्ते यावेळी जोडले जाणार आहेत. देशातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक लोकांशी या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी आम्ही तयारी करीत आहोत, असे यावेळी तावडे यांनी सांगितले.
हेही वाचा -