मुंबई : शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपाप्रणित एनडीएवर आपल्या पक्षाला सावत्र वागणूक दिल्याचा आरोप केला होता. त्याच्या एका दिवसानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. 'भारतीय जनता पक्ष हा मगर किंवा अजगरासारखा आहे. तो ज्याच्या सोबत असेल त्याला गिळंकृत करतो', असे संजय राऊत म्हणाले आहेत.
'म्हणून भाजपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला' : पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षापासून दुर जाण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर तत्कालीन अविभाजित सेना आणि भाजप यांच्यातील संबंधात झालेल्या दुराव्याचा त्यांनी उल्लेख केला. राऊत म्हणाले की, 'शिवसेना भाजपपासून दुरावली कारण ते आमचा पक्ष संपवू पाहत होते. भाजप हा मगर किंवा अजगरासारखा आहे. जो कोणी त्यांच्याबरोबर जातो, त्याला ते गिळतात. या मगरीपासून दूर राहण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य होती, असे आता त्यांना (उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करणाऱ्या शिवसेनेच्या खासदार - आमदारांना) वाटेल, असे संजय राऊत म्हणाले.
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता आहे' : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत कमालीची अस्वस्थता असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला. राऊत म्हणाले की, 'शिवसेनेची स्थिती गजानन कीर्तिकर यांनी म्हटल्याप्रमाणेच होती. भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला नाही. त्यांनी शिवसेना नेत्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला.
काय म्हणाले होते गजानन कीर्तिकर? : शुक्रवारी शिवसेना खासदार कीर्तिकर म्हणाले होते की, 'आम्ही एनडीएचा भाग आहोत, त्यामुळे आमचे काम त्यानुसार व्हायला हवे. एनडीएच्या घटक पक्षांना योग्य दर्जा मिळायला हवा. मात्र आम्हाला सावत्र वागणूक दिली जात आहे असे वाटते.' उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. तथापि, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आणि गेल्या वर्षी माविआ सरकार पडले. यानंतर शिंदे भाजपशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री बनले.
हेही वाचा :