मुंबई - आर्थिक गुन्हे शाखेने मला पाठवलेल्या नोटीशीशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या पत्त्यावर ही नोटीस आलेली नाही. केवळ राजकीय हेतूने प्रेरित हे षढयंत्र आहे. दोन कंपन्यांच्या वादातील हा भाग आहे. पण त्या कंपन्यांच्या संदर्भात दाखल झालेल्या 'एफआयआर'मध्येही माझे कुठेही नाव नाही. पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे आज आर्थिक गुन्हे शाखेने पाठवलेल्या नोटीशीला उत्तर देताना भाजप नेते प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले.
अनेक पालिकेतील घोटाळे उघड केले, त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही
पुढे लाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, मी सात दिवसाचा वेळ मागितला आहे. त्यानुसार मी त्यांना पुरावे सादर करेन. मी सध्या तरी कुणाच्या विरोधात कायदेशीर दाद मागणार नाही. पण, नोटिशीतील सर्व माहिती माझ्या जवळ आहे. आतापर्यंत किरीट सोमैय्या आणि मनोज कोटक यांनी अनेक पालिकेतील घोटाळे उघड केले आहेत. त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही. प्रसाद लाड या व्यक्तीला त्रास देण्यासाठी मुद्दाम हे चालले आहे. मी सर्व व्यवसाय हे अधिकृत कर भरून करत आहे. ज्यांचा नावे आणि व्यवसायासंबंधीशी नोटीस आली आहे, त्यांच्याशी काही संबंध नाही.
मी दुसऱ्यांसारखा हंगामा वगैरे करत नाही, राऊंताना टोला
शिवसेना नेत्यांची 'ईडी'कडून चौकशी होत असताना आता भाजपच्या एका नेत्यावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात चौकशीचे गंडांतर ओढवले आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. साधारण 20 दिवसांपूर्वी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता प्रसाद लाड यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यात त्यांनी पत्रकार परिषद घेत पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले. मी दुसऱ्यांसारखे हंगामा वगैरे करत मला आलेल्या नोटिशीचे खंडन करणार नाही, पोलिसांना योग्य सहकार्य करेन, असे म्हणत संजय राऊत यांना प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत टोला लगावला.
केंद्र विरुद्ध राज्य सरकार नोटीशी सामना
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी सत्र आणि विविध नोटिसा नेत्यांना येत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांना भाजपच्या सूडबुद्धीने ईडीने नोटीस पाठवल्या, असा आरोप महाविकास आघाडी नेते करत असताना आता राज्यात भाजप नेत्यांना वेगवेगळ्या चौकशा व नोटीस पोलिसांकडून येत आहेत.कालच देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक विश्वासू सहकारी गिरीश महाजन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यानंतर आज लाड यांना गुन्हे शाखेची नोटीस आली.त्यामुळे केंद्र विरुद्ध राज्यसरकार असा सामना पाहायला मिळत आहे.