मुंबई - भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशच्या सह प्रभारी पंकजा मुंडे यांनी जातीनिहाय जनगनना करण्याची मागणी केली आहे. देशात ओबीसीची जनगणना होणे अत्यंत गरजेचे आहे, केंद्र सरकारने 2021 च्या जनगणनेमध्ये याचा समावेश करायला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत पंकजा मुंडे यांनी हिंदी भाषेतून ट्विट करत आपली मत व्यक्त केले आहे.
गोपीनाथ मुंडेनींही केली होती मागणी
2011 मध्ये पंकजा मुंडे यांचे वडील आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी देखील संसदेमध्ये ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली होती. देशात 1931 नंतर जातीआधारित जनगणना झालेली नाही. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'आम्ही ही या देशाचे नागरिक आहोत, आमचीही जनगणना करा. ओबीसी जनगणनेची आवश्यकता आहे. आणि गावागावातून निघणारा आवाज राजधानीत नक्कीच पोहोचेल यात काही शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केले.
या राज्यांनी केली जातीनिहाय जनगणनेची मागणी-
देशातील बिहार, ओडिशा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये बिहार सरकारने याबाबतचा प्रस्ताव पारित केला होता. यामाध्यमातून केंद्र सरकारकडे 2021 च्या जनगणनेमध्ये जातीनिहाय जनगणना करणेची मागणी करण्यात आली आहे.