मुंबई - सर्वाेच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात टोलावला. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या आडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.यांनी ट्वीट करत 'आदु…तुझ्या पप्पांनी केंद्रसरकारकडून तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे', असे त्यांनी म्हटले आहे.
तर मराठा आरक्षण टिकले असते -
या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणचा नियोजित पद्धतीने खून केला आहे. सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे. राज्य सरकारने कसलीही तयारी न करता फक्त नाटक आणि ढोंगीपणा केला, असा आरोपही त्यांनी केला. तसेच आदित्य किंवा तेजसचे कोणी अधिकार हिसकावून घेतले असते किंवा त्यांचे भविष्य कोणी अंधारात टाकले असते, तर मराठा आरक्षण नक्कीच टिकले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.
मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय -
5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने एकमताने राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाने 50 टक्के मर्यादेचे भंग होत असल्याचे स्पष्ट केले. मंडल आयोगाने ठरविलेल्या 50 टक्क्यांच्या मर्यादेबाहेर जाऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची कसलीही अपवादात्मक स्थिती नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मंडल आयोगाचा निर्णय व्यापक खंडपीठाकडे पुनर्विचारासाठी पाठविण्यासही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.