मुंबई - महापालिकेने कंगना रणौत यांच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईविरुद्धच्या याचिकेवर आज 27 नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालय निकाल दिला आहे. अभिनेत्री कंगना राणौतला नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर भाजपा नेते किरीट सोमैया यांनी महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सुरुवातीपासूनच भाजपाने कंगनाला पाठिंबा दिला होता. आता उच्च न्यायालयाने कंगनाच्या बाजूने निर्णय दिल्याने भाजपाने त्याचे स्वागत केले आहे. सोमैया यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. न्यायालयाच्या निर्णयाने राऊत यांची बोलती बंद झाली आहे, असे सोमैया म्हणाले.
अतुल भातखळकरांचाही सरकारवर निशाणा -
राज्य सरकारने सूड बुद्धीने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. मात्र, सत्याला न्याय मिळतोच. न्यायालयाचा हा निकाल म्हणजे राज्य शासनाला जोरदार चपराक असल्याचे, अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
काय आहे प्रकरण -
बीएमसीने 9 सप्टेंबरला कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयातील काही भाग बेकायदेशीर ठरवून तोडला होता. मालमत्तेतील काही बांधकाम बेकायदेशीरपणे केल्याचेही महापालिकेचे म्हणणे होते. महानगरपालिकेची कारवाई थांबवण्याच्या मागणीसाठी कंगना रणौततर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने कंगनाला दिलासा देत बांधकाम स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी आज उच्च न्यायालयात निकाल देण्यात आला.