मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमैया यांचे कथित व्हिडिओ एका वृत्तवाहिनीने प्रकाशित केले आहेत. किरीट सोमैयांच्या या व्हिडिओनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मात्र हे व्हिडिओ बाहेर आल्यानंतर आपण कोणत्याही महिलेचे लैंगिक शोषण केले नसल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. याप्रकरणी योग्य तो तपास करण्याची विनंती किरीट सोमैयांनीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती चौकशी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण : भाजपचे नेते किरीट सोमैया यांचे कथित व्हिडिओ बाहेर आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत भाजप नेते किरीट सोमैया हे उघडे असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओत किरीट सोमैया व्हिडिओ कॉलवर असल्याचेही स्पष्ट दिसत आहे. मात्र किरीट सोमैया यांच्यासोबत कोण आहे, किंवा ते एकटेच आहेत, याबाबत कोणतीही पुष्टी होत नाही. या आक्षेपार्ह व्हिडिओत किरीट सोमैया असल्याने विरोधकांच्या हातात आयतेच कोलित मिळाले आहे.
अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ असल्याचा दावा : किरीट सोमैयांचे अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे. त्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही आपल्याकडे किरीट सोमैया यांच्या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह असल्याचा दावा केला आहे. आपण हा पेनड्राईव्ह घेऊन विधान परिषदेत येत असल्याचे स्पष्ट करुन किरीट सोमैयांविरोधात हल्लाबोल केला होता. आज विधानभवनात या व्हिडिओंचा एक पेन ड्राईव्ह दानवे यांनी शासनाला सोपवल्याचीही माहिती मिळत आहे. फडणवीस यांनी यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.
हेही वाचा -