मुंबई - राज्यात पुन्हा भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीबाबत चर्चेला उधाण आले आहे. शुक्रवारी (6 ऑगस्ट) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती सक्रिय होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यामुळे राज ठाकरे मराठी विरुद्ध परप्रांतीयांचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार का? असा प्रश्न आता या भेटीनंतर उपस्थित झाला आहे.
20 दिवसात पाटील-ठाकरेंची दुसरी भेट
गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या गाठी-भेटी सुरू आहेत. आज चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. तर ही सदिच्छा भेट असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, मागील २० दिवसात या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट आहे.
काही शंका होत्या त्या दूर केल्या - पाटील
चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे भाजप- मनसेच्या युतीच्या चर्चांना उधाण आले. तर, 'युतीचा कोणताच प्रस्ताव या बैठकीत नव्हता. हे दोन पक्ष एकत्र येवून निवडणुका लढवतील असा कुठलाच विचार आता नाही. राज ठाकरे यांचे बोरवली येथे झालेले भाषण मी ऐकलं आहे. तरी काही शंका होत्या, त्या दूर करण्यासाठी आलो होतो. दोन भूमिका असतात. माणूस म्हणून त्यांना काय वाटतं हे मला जाणून घ्यायचं होतं. त्यांचं म्हणणं आहे की उत्तर भारतात ८० टक्के नोकऱ्या तेथील लोकांना मिळाल्या पाहिजेत, तशा त्या महाराष्ट्रात पण मिळाल्या पाहिजेत. हे जे तुम्ही म्हणता ती त्यांची भूमिका योग्य आहे. पण जेंव्हा ते बोलतात त्यात उत्तर भारतीयांना कटुता असल्यासारखे वाटते', असे चंद्रकांत पाटलांनी म्हटले.
परसेप्शन बदलले पाहिजे - पाटील
'मी त्यांना म्हणालो, की हे परसेप्शन बदलले पाहिजे. लोकांना कटुता आहे असे वाटते. तुम्ही तुमची भूमिका व्यापक करावी असे मी त्यांना सांगितले आहे. या दोन वर्षात मला लोकांपर्यंत जाता आले नाही, असे राज ठाकरे म्हणाले. त्यांनी मला समजवलं. पण आता त्यांना या गोष्टी व्यवहारात आणाव्या लागतील', अशी चर्चा झाल्याचेही पाटलांनी सांगितले.
'संजय राऊत यांनी निवडून येऊन दाखवावे'
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि महाराष्ट्र निर्माण सेना यांच्या संभाव्य युतीबाबत टीका केली. याबाबत बोलताना पाटील यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. 'एकदा संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत एक सेफ जागा निवडणूक लढून जिंकून येवून दाखवावे. त्यांनी त्यांचे दंडही थोपटून पहावे आणि ताकदही पहावी', असे पाटील म्हणाले.
संजय राऊत पाटलांचे आव्हान स्विकारणार?
चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना आता आव्हान दिले आहे. त्यामुळे संजय राऊत आता हे आव्हान स्विकारणार का? याकडे लक्ष लागले आहे.
युतीचा प्रस्ताव नाही - पाटील
'राज ठाकरे यांच्याबद्दल आकर्षण आहे. त्यांनी आणि मी विद्यार्थी चळवळीत काम केले आहे. राज ठाकरे माझ्या घरी चहासाठी आले तर आनंद होईल. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुढच्या वेळी मला पत्नीसोबत या असे सांगितले. आमच्या पक्षात झालेल्या घडामोडीबद्दल आम्ही माहिती एकमेकांना सांगतो. आज राज यांच्या भेटीची माहिती देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार,आशिष शेलार यांना सांगणार आहे. त्यांनी परप्रांतियांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होणार नाही, असं मी गेल्या वर्षभरापासून सांगितलं आहे. पण या भेटीत युतीचा प्रस्ताव झालेला नाही', असं पाटील यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद यांचे नाव; मोदींची घोषणा