मुंबई - 'काल शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा झाला. त्यात शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. यावर भारतीय जनता पार्टीने प्रतिक्रिया द्यावी, अशी इच्छा पत्रकारांनी व्यक्त केली होती. ठाकरेंचे हिंदुत्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे आता भेसळयुक्त झाले आहे. आम्ही हिंदू संस्कृती जपणारे आहोत. त्यामुळे आम्ही काल सणासुदीच्या दिवशी याविषयी प्रतिक्रिया दिली नाही', अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यावर केली आहे.
शिवसेनेच्या मनात भाजपाची दहशत -
शिवसेनेचा कालचा (रविवार) महाविजय मेळावा म्हणजे महाफ्लॉप शो होता. उद्धव ठाकरे यांचा जळफळाट होत होता. त्यांनी मोहन भागवतांवर टीका केली. त्यांना नम्रपणे विनंती करतो कोणाची तुलना कोणाशीही करू नका. उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांची शाल बाजूला सारली आहे. मोहन भागवतांचे भाषण मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित ऐकले नाही. सीएएबद्दल पहिल्यांदा समर्थन व सभागृहातून पळ आणि नंतर पुन्हा विरोध, असे ठाकरेंचे हिंदुत्व भेसळयुक्त आहे. अर्णब गोस्वामी आणि कंगनाने शिवसेनेची वाट लावली. त्याचे दडपण आणि भाजपाची दहशत ठाकरेंच्या कालच्या भाषणात दिसली, असे शेलार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घ्यावेच -
उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे भेसळयुक्त झाले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपा, संघ आणि काळ्या टोपीकडून हिंदुत्ववाचे प्रमाणपत्र नक्कीच घ्यायला हवे. ठाकरे म्हणतात हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही म्हणतो तुम्ही अगोदर घरातून बाहेर पडून तरी दाखवा. टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्या नाही तर घरी अंडी उबवायची का? असा टोला शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगवाला.
अगोदर महापौर सांभाळा -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. त्यालाही शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे. अगोदर तुमच्या महापौरांना आणि मुंबईला सांभाळा मग दुसऱ्यांना देश सांभाळण्याचे सल्ले द्या, असे शेलार म्हणाले. भाजपाला देश सांभाळण्याचे मार्गदर्शन करणे म्हणजे सूर्यावर थुंकणे आणि आपल्यावर उडवून घेण्यासारखे आहे, असेही शेलार म्हणाले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे -
सगळ्या राज्यात पाडापाडी कशासाठी करताय? पक्षावर लक्ष द्या पण थोडे लक्ष देशावरही द्या. देश रसातळाला चालला आहे. देश कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. क्रांतिकारकांनी भाजपसाठी हा देश स्वतंत्र केलेला नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हा पंतप्रधान मोदींचा अपमान आहे. संपूर्ण देशात फार विचित्र परिस्थिती सुरू आहे. आर्थिक घडी नीट बसवण्याऐवजी ते इतरांचे सरकार पाडण्यात मग्न आहेत, असे ठाकरे म्हणाले होते.
दरम्यान, आशिष शेलारांनी संजय राऊत यांच्या कालच्या सभेतील भाषणाची स्तुती केली. संजय राऊतांचे भाषण अतिशय प्रभावी आणि स्वागतार्ह असल्याचे शेलारांनी सांगितले.