मुंबई : महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज सायंकाळी मुंबईतील बीकेसी मैदानात होत आहे. याप्रसंगी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, जे मैदान ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाला ही कमी पडते. अशा मैदानाची निवड महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेसाठी केली आहे. एकट्या भाजपाची सभा असते, तेव्हा व्यवस्थेला जे मैदान वापरावे लागते अशा बीकेसीतील सर्वात छोट्यातील छोट्या मैदानाची निवड महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेसाठी केली आहे. हीच त्यांची वज्रमूठ का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या सभेसाठी मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे, असे सांगत त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे.
भविष्यात नरे पार्कातच सभा : आशिष शेलार पुढे म्हणाले की, एरवी सभेसाठी शिवाजी पार्क मैदानाचा अट्टहास करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने सभेसाठी शिवाजी पार्क सोडले. बीकेसी मधील मोठी मैदाने घेणे सुद्धा त्यांनी टाळले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा प्रवास ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिष्ठांकडे होत आहे. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीला नरे पार्कातच सभा घ्याव्या लागतील, असे वाटतेय! असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.
तिसरी वज्रमूठ सभा : यापूर्वी महाविकास आघाडीच्या संभाजीनगर व नागपूर अशा दोन ठिकाणी वज्रमूठ सभा झाल्या. या दोन्ही सभेला उत्कृष्ट प्रतिसाद भेटल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले होते. त्यावर सुद्धा भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांनी टीका केली होती. आता आजच्या मुंबईतील सभेसाठी महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते या सभेमध्ये भाषण करणार आहे, अशी माहिती आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी विरोधकांकडे अनेक मुद्दे आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. फक्त खोटे आकडे सांगून ही सभा ऐतिहासिक करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.