मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी तपास केला जात आहे. यादरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मोठ्या नेत्याच्या जावयाला सुद्धा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलेला आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. दरम्यान, बुधवारी एनसीबी कार्यालयामध्ये समीर खान नावाची व्यक्ती चौकशीसाठी हजर झाली आहे. ही व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा जावई असल्याचे समजत आहे.
नार्कोटिक्सने केली आहे कारवाई
सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलिवूडमधील ड्रग्स तस्करी प्रकरणी तपास केला जात आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी एनसीबी कडून करण सजनानी या ब्रिटिश अनिवासी भारतीयाला अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. याबरोबरच अभिनेत्री दिया मिर्झा हिची माजी मॅनेजर म्हणून काम पाहिलेल्या राहिला फर्निचरवाला हिच्यासह आणखीन एका महिलेला अटक करण्यात आली होती. यानंतर या आरोपींच्या एनसीबी कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याबरोबरच मुंबईतला मुच्छड पानवाला या आरोपीला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी मुच्छड पानवाला उर्फ राम कुमार जयशंकर तिवारी याला अटक
कोण आहे मुच्छड पानवाला?
मुच्छड पानवालाचे खरे नाव रामकुमार जय शंकर तिवारी असून 1970 च्या दशकामध्ये मुंबईत आल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांचा पान बनवण्याचा व्यवसाय सुरू ठेवला होता. मात्र, यामध्ये प्रगती करत त्याने बॉलिवूडमधील सेलिब्रेटी व उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या संपर्कात राहून स्वतःचा व्यवसाय पसरवला होता. दरम्यान, मुंबईतल्या वेगवेगळ्या परिसरातील उच्चभ्रू वस्ती व बॉलिवूडमधील कलाकारांसोबत मुच्छड पानवाला याची चांगली ओळख आहे.
काय आहे प्रकरण
अभिनेता सुशांत सिंह प्रकरणातील अंमली पदार्थ तस्कर अनुज केशवानीला एनसीबीने अटक केली होती. अनुज केशवानी करण सजनानीकडूनच अंमली पदार्थ घेऊन तस्करी करायचा. एवढेच नाही तर, परदेशातील महागड्या अंमली पदार्थांची तस्करीही हा करण सजनानी करायचा. करण सजनानी हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून तो ब्रिटिश नागरिक आहे. एनसीबीने त्याच्याकडून ७५ किलो भारतीय गांजा, तर, १२५ किलो परदेशी अंमली पदार्थ जप्त केलेत. करन सजनानी हा परदेशी अंमली पदार्थांची भारतातील गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मेघालय या राज्यात तस्करी करायचा.
हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या : अमली पदार्थ प्रकरणी करन सजनानी ब्रिटीश मिलेनिअरला अटक