मुंबई - पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूची राज्य सरकार चौकशी करणार आहे की नाही? असा संतप्त प्रश्न भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील उपस्थित होते.
पूजाच्या मृत्यूच्या चौकशीची घोषणा तातडीने केली नाही आणि तोपर्यंत वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर महिला मोर्चातर्फे शनिवार 27 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असे उमा खापरे यांनी यावेळी जाहीर केले. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात भाजपच्या वतीने युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा आणि महिला मोर्चाच्या वतीने संजय राठोड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, असे माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजप ओबीसी मोर्चाद्वारे बुधवारी 3 मार्चला राज्यभरात आसूड आंदोलन करणार आहोत, असे योगेश टिळेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाद्वारे एक तारखेला राज्यभरात उग्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया विक्रांत पाटील यांनी दिली. या सगळ्या मुद्द्यावर भाजप ओबीसी मोर्चा आणि भाजप युवा मोर्चातर्फे राज्यभर स्वतंत्ररित्या आंदोलन करण्यात येईल, असे ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी यावेळी सांगितले.