मुंबई - लोकसभेची राज्यातली रणधुमाळी संपताच, भाजपने आपली नजर विधानसभेसाठी वळवली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील गझदरबांध परिसरातील नालेसफाईची पाहणी केली. राज्यातल्या निवडणुकांचा फायदा घेत आचारसंहितेच्या नावावर कंत्राटदारांनी अद्याप कामाला वेगच दिलेला नाही. त्यामुळे या विलंबाबाबत आयुक्तांनी लेखी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. यापुढे भाजप मुंबईभर नालेसफाईच्या कामावार लक्ष ठेवण्याचे अभियानच हाती घेणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
वांद्रे, खार, सांताक्रुझ, अंधेरी, जूहू या पश्चिम उपनगरांच्या भागात पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी गझदर बांध येथील नालेसफाईची कामे वेळीच पूर्ण होणे अपेक्षित असते. गझदरबांध येथे बांधण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनचे कामही पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामांमध्ये दिरंगाई झाल्यास वांद्रे ते अंधेरी दरम्यानच्या नागरी भागासह पश्चिम रेल्वेला पुराचा फटका बसतो. विधानसभेच्या आधीच पावसाळा असल्याने त्याचा फटका बसू नये याची काळजी या निमित्ताने भाजपकडून घेतली जात आहे. मुंबई महापालिकेच्या सत्तेत भाजप नसली तरी आम्ही पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शेलार यांनी गझदरबांध परिसरातील नॉर्थ, मेन, साऊथ एव्ह्युन्यू यासह पीनएटी या चार प्रमुख नाल्यांच्या सफाईच्या कामाची व पंपिंग स्टेशनच्या कामाची पाहणी केली. काही नाल्यांच्या सफाईला सुरूवातच नाही.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप काही नाल्यांच्या कामांना सुरूवात झालेली नाही. त्यामुळे पालिका आयुक्तांनी तातडीने याबाबत लक्ष घालून यंत्रणेला कामाला वेग देण्याचे निर्देश देण्याची गरज आहे, असे शेलार यांनी यावेळी सांगितले. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांसह भाजप नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला उपस्थित होते.