मुंबई: राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकीपैकी कोकण शिक्षक मतदारसंघाचा निकाल हाती आला आहे. भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत विजयाची पताका फडकावली. या निवडणुकीत भाजप-युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांचा पहिल्याच फेरीत दारुण पराभव केला. म्हात्रे यांना वीस हजारहून अधिक मते मिळाली तर बाळाराम पाटील यांना नऊ हजार मतांवर समाधान मानावे लागले.
जोरदार लढत: राज्यात शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत जुंपली होती. उमेदवारांची पळवापळवी करण्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत सावळा गोंधळ सुरू होता. कोकणात शिक्षक मतदार संघासाठी भाजपला उमेदवार मिळत नव्हता. भाजप आणि शिंदे गटाची युती असल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना भाजपने पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीने शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता.
गुलालाची उधळण करत एकच जल्लोष: शिक्षक, पदवीधर मतदार संघाची मतदान प्रक्रिया ३० जानेवारीला पार पडली. आज मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. कोकणात बाळाराम पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. बाळाराम पाटील यांना ९५०० तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांना सर्वाधिक २० हजार आठशे मते मिळाली. म्हात्रे यांनी पाटील यांचा सुमारे ११३०० मतांनी पराभव केला. ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. फटाके फोडत पेढे वाटत आनंद साजरा केला.
कोकणात महाविकास आघाडीला झटका: रायगड जिल्ह्यात शेकापचे वर्चस्व आहे. महाविकास आघाडीने त्यामुळे शेकापच्या पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. तरीही भाजपने कोकणात महाविकास आघाडीला पहिला झटका दिला आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासोबत असतानाही शेकापचा दारुण पराभव झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. बाळाराम पाटील यांनी पराभव झाल्याचा कौल मान्य केल्याचे म्हटले आहे. तर गेल्या सहा वर्षांपासून शिक्षकांसाठी केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. भाजप, शिंदे गट आणि रामदास आठवले यांच्या १९ संघटनांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ केल्याचे ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले.
मतदानाचा हक्क बजावला: कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे पाच जिल्हे समाविष्ट होते. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत मतदान पार पडले होते. या निवडणुकीकरीता नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या शिक्षक मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला होता. ठाणे जिल्ह्यातील एकूण २० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती. अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला होते. ठाणे जिल्ह्यात एकूण १५ हजार ३०० शिक्षक मतदार होते. यामध्ये ६०२९ पुरुष तर ९२७१ स्त्री मतदारांचा समावेश होता. मतदानात एकूण १३ हजार ५९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.