मुंबई: राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगला आहे. राणा दांपत्याला झालेली अटक आणि सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजप नेतेही यावरून आक्रमक झाले असून शिवसेनेची गुंडगिरी सुरू आहे, शिवसेनेला जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. त्यातच आता भाजपचे शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहसचिवांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. महाविकास आघाडी आणि पोलिसांविरोधात तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपच्या शिष्टमंडळात आमदार मिहीर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शहा, आमदार राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा आणि किरीट सोमैय्या यांचा समावेश आहे. ते दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेतील. शनिवारी मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झाल्याचा दावा सोमैय्या यांनी केला होता. ट्विट करत त्यांनी, "शिवसेनेच्या गुंडांनी जोरदार दगडफेक केली, माझ्या कारच्या खिडकीची काच फोडली, मी जखमी झालो, वांद्रे पोलिस स्टेशनला धाव घेतली." असे म्हणले होते.
"मला धक्का बसला आहे, खार पोलिस स्टेशनच्या कॅम्पसमध्ये 50 पोलिसांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या 100 गुंडांनी माझ्यावर दगडफेक केली. मला मारायचे आहे. पोलिस आयुक्त काय करत आहेत? पोलीस ठाण्यात जमायला इतक्या माफिया सेनेच्या गुंडांना परवानगी कशी? असे त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणले होते. यापूर्वी शनिवारी अटक करण्यात आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांची भेट घेण्यासाठी ते यांनी खार पोलीस स्टेशनला गेले होते.
दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची केंद्राला विनंती केली आहे. सोमैय्या यांच्यावर मुंबईत एका पोलिस स्टेशनबाहेर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्ही केंद्र सरकारला संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती करणार आहोत, असे फडणवीस यांनी म्हणले होते.
हेही वाचा : Saamana Editorial: समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो हे आश्चर्यच