मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली चौथी यादी जाहीर केल्यानंतर दिग्गज नेत्यांचा पत्ता कापल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, मंत्री विनोद तावडे आणि माजी मंत्री प्रकाश मेहता यांची उमेदवारी पक्षाने कापली असली तरी पक्षाला या कपातीचा निवडणूक निकालात प्रतिकुल परिणाम होणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
चौथ्या यादीत मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या जागी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी नाकारून पक्षाने एकनाथ खडसेंना मोठा धक्का दिला आहे. यामागे खडसेंवरील भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले.
हेही वाचा - उमेदवारी न मिळणं अनपेक्षीत, आत्मपरिक्षण करणार - विनोद तावडे
बोरीवलीतून विनोद तावडेंच्या जागी सुनिल राणे आणि घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहतांच्या जागी पराग शहांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे विनोद तावडे आणि प्रकाश मेहतांचा पत्ता कट झाला आहे. प्रत्येक तिकीट कपातीला राजकीय अर्थ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ची खुर्ची बळकट करून पक्षांतर्गत विरोधकांना एकप्रकारे इशारा दिल्याचे ज्येष्ठ पत्रकार किरण तारेंनी सांगितले.
हेही वाचा - विधानसभेच्या मैदानातून खडसेंची माघार, रोहिणी खडसेंना सहकार्य करण्याचे आवाहन