मुंबई - ईशान्य मुंबई (उत्तर पूर्व) लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांच्या संपत्तीमध्ये घट झाली आहे. कोटक यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी आपल्याकडे ३ कोटी २९ लाख १ हजार ६१६ रुपयांची संपत्ती असल्याचे नोंद केले आहे. २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक लढवताना कोटक यांनी आपली संपत्ती ४ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते.
ईशान्य मुंबई येथील भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी मातोश्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामुळे सोमय्या यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोध होता. यामुळे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना उमेदवार म्हणून घोषीत करण्यात आली. कोटक यांनी शक्तीप्रदर्शन करत मुलुंड येथील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला.
उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे ३ कोटी २९ लाख १ हजार ६१६ रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे. कोटक यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून त्यांचे २०१७-१८ मधील उत्पन्न ११ लाख ९२ हजार, रुपये, त्यांच्या पत्नीचे उत्पन्न ५ लाख ८ हजार रुपये, तर एकत्रित कुटूंबाचे उत्पन्न ८ लाख ७ हजार रुपये इतके आहे. त्यांच्या नावे १ कोटी ९७ लाख रुपयांची चल तर ३ कोटी ४९ कोटींची स्थावर संपत्ती आहे. त्यांच्यावर २० लाख रुपयांचे कर्ज असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कोटक यांच्यावर १ गुन्हा दाखल असून एका गुन्ह्यात त्यांना दोषी मानण्यात आल्याचे म्हटले आहे.