मुंबई - भाजपने निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर केला आहे. हा बाल हक्क कायद्याचा भंग असून निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. याप्रकरणी भाजपला नोटीस द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. भाजपकडून प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयजयकार असून यात मैं भी चौकीदार या मोहिमेचा उल्लेख करण्यात आला आहे.
या व्हिडिओत लहान मुले 'ये नया भारत है, हम घुसेंगे भी और मारेंगे भी' असे हिंसात्मक बोलत असल्याचे दर्शवण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात सैन्याचाही वापर केला गेला आहे.
या व्हिडिओतील चित्रीकरण बाल हक्क कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. भाजपसोबत आता शेतकरी नाहीत, तरुण नाहीत की, कुणी कामगार वर्ग नाही म्हणून त्यांनी आता लहान मुलांचा वापर केला असल्याची टीकाही मलिक यांनी केली आहे.