नवी मुंबई - सध्या लॉकडाऊन असल्याने पोलिसांना गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सुट्टी न घेता सतत काम करावे लागत आहे. शिवाय त्यांच्यावर कामाचा ताणदेखील वाढला आहे. अशावेळी पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी स्वत: पोलीस आयुक्त संजयकुमार वाढदिवस असणाऱ्या पोलिसांसाठी केक पाठवून त्यांना सुखद धक्का देत आहेत. असाच अनोखा वाढदिवस कळंबोली पोलीस ठाण्यात साजरा झाला असून यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी गाणे गात पोलिसांचा आंनद द्विगुणित केला.
कोरोना विषाणू व लॉकडाऊन काळामध्ये पोलिसांवर प्रचंड ताण आहे. अनेक ठिकाणी बंदोबस्त व दिवस रात्र काम करून पोलीस थकलेले दिसून येतात. अशातच आपला स्वतःचा वाढदिवसदेखील काहींना लक्षात नसून लक्षात असला तरी काहीजण कोरोनामुळे तो साजरा करू शकत नाहीत. मात्र, नवी मुंबई आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ - 1 व 2 मध्ये पोलीस आयुक्त संजय कुमार हे प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या वाढदिवसाला केक पाठवत आहेत.
आयुक्त संजय कुमार यांच्या संकल्पनेतून कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ब्रह्मदेव जाधव यांचा 47 वा वाढदिवस कळंबोली पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी स्वतः गाणे गाऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला व इतरांचेदेखील मनोरंजन करून मनोबल वाढवले. सतीश गायकवाड यांच्या या उपक्रमाचे कळंबोली परिसरात कौतुक होत असून कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये त्यांची उत्तम प्रतिमा निर्माण झाली आहे.