मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रसिद्ध चित्रकार शैलेश आचरेकर यांनी थ्रीडी चित्राच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास मांडणारी आगळीवेगळी कलाकृती तयार केली आहे. 12 विविध दृश्य या चित्रात रेखाटण्यात आले आहे.
थ्रीडी पेंटिंगच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना -
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. यामुळे यंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराजाची जयंती साजरी करण्यावर भर असणार आहे. प्रसिद्ध चित्रकार शैलेश आचरेकर यांनी थ्रीडी चित्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे. या चित्रातून एकावेळी त्यांनी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या काही घटना रेखाटलेल्या आहेत. आपण त्या कलाकृतीच्या भोवती फिरणार तेव्हा हे दृश्य आपल्या डोळ्यात दिसतील, अशाप्रकारची आगळी वेगळी कलाकृती आचरेकर यांनी साकारली आहे.
चित्रातून इतिहास मांडण्याचा प्रयत्न -
या संदर्भात बोलताना, हे चित्र बनवण्यामागे एक गोष्ट असल्याचे आचरेकर यांनी सांगितले. मी शिवाजी पार्क येथे नेहमी फिरायला जातो. शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य कलाकृती आहे. ती कलाकृती पाहताना नेहमी माझ्या डोक्यात यायचे की यावर काही चित्र काढायला हवे. त्यानंतर मी चित्र काढायचे ठरवले. छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहायचे झाले, तर 100 पाने कमी पडतील एवढा मोठा त्यांचा इतिहास आहे. म्हणून मी या चित्राच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे, असेही त्यांनी म्हटले.
या घटनांचा आहे समावेश -
महाराजांच्या राज्याभिषेक, अफजलखानाचा वध, अशा विविध घटना यात रेखाटलेल्या आहेत. या चित्राचे वैशिष्ट म्हणजे या चित्राभोवती फिरल्यानंतर त्याप्रमाणे तुम्हाला विविध चित्र दिसतात. ढगांमध्ये जशा प्रकारे वेगवेगळे आकार दिसतात, त्याचप्रकारे या चित्रांमध्ये महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना रेखाटल्या आहेत. ही कलाकृती तयार करण्यासाठी दीड महिन्याचा कालवधी लागल्याचेही आचरेकरांनी सांगितले.
हेही वाचा - भोकरदन तालुक्यासह शहरात मुसळधार पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान