मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व बसपा नेत्या मायावती यांना दोन दिवस प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली असून त्यावर देशभरात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईचे काँग्रेसने स्वागत करत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रकारे सैनिकांच्या नावाने मते मागत आहेत, त्यांच्यावर आयोग कधी कारवाई करणार असा सवाल काँग्रेसचे नेते व आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे.
भाई जगताप यांनी मायावती व योगी यांच्यावरील प्रचार बंदीसंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, निवडणूक आयोगाने त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करून जो निर्णय घेतला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. आयोग हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचे संवर्धन करणारा आहे. त्यामुळे मी या गोष्टीचे स्वागत करतो. मात्र, आयोगाला विनंती करतो की, या देशाच्या जवानांनी दाखवलेला अतुल्य पराक्रमाचा गैरवापर पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. सर्जिकल स्ट्राईक असेल अथवा पुलवामा घटनेचा आधार घेऊन जी मते मागितली जात आहेत, त्याचा आम्ही निषेध केला आहे. त्यावर निवडणूक आयोगाने बंदी घालावी आणि मोदींवर करवाई करावी, अशी मागणी भाई जगताप यांनी केली आहे.