मुंबई - वेतन करार, अर्थसंकल्पाचे विलीनीकरण, बोनस आदी मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने धरणे आंदोलन केले होते. यानंतर आंदोलनाचे रुपांतर उपोषणात झाले होते. मात्र, आज (गुरुवारी) उपोषण ठिकाणी माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी भेट देऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. तर राणेंच्या या आवाहनानंतर कृती समितीकडून येत्या ७ सप्टेंबरपर्यंत उपोषण मागे घेत असल्याचे सांगण्यात आले.
या भेटीदरम्यान मी बऱ्याच वर्षांनी बसस्थानकामध्ये आलो आहे. बेस्टही जागतिक दर्जाचे सेवा देणारी ओळखली जायची. तेव्हा कामगारांना मोबदलाही चांगला मिळत होता. आता मात्र बेस्टचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कर्मचारी मराठी आणि सेनेची सत्ता असताना बेस्टची वाटचाल खासगीकरणाकडे सुरु आहे. शिवसेनेला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे, अशी टिकाही राणे यांनी यावेळी केली. तुमच्या सगळ्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे. तर या मागण्यांसाठी सगळी राजकीय ताकद पणाला लावेन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यासोबतच काहीही झाले तरी बेस्टचे खाजगीकरण होऊ देणार नाही. कुणीही नोकरी जाईल, रोजी रोटी जाईल ही भीती मनात ठेऊ नका, असे सांगत राणे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना उपोषण सोडण्याच आवाहन केले. तर गौरी-गणपतीपर्यंत जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र आपण त्यानंतर संप करु, असा विश्वासही त्यांनी यावेळी आंदोलकांना दिला.
का केले गेले उपोषण -
वेतन करार, पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान अशा विविध मागण्या बेस्ट प्रशासन, पालिका आयुक्त, राज्य सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्यासाठी ९८ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने मतदान केले. वडाळा बसस्थानकाबाहेर बेस्ट कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरु केले. बेस्ट उपक्रमाबरोबर झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघत नसल्याने गेले तीन दिवस उपोषण केले.
यानंतर शिवसेनेने सातवा वेतन आयोग तत्वता लागू करण्याचे जाहीर केले. त्यानंतरही उपोषणकरत्या कृती समितीबरोबर चर्चा योग्य प्रकारे झालेली नाही. त्यातच बेस्ट कृती समितीचे प्रमुख शशांक राव यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले होते. यानंतर ते पुन्हा उपोषणस्थळी दाखल झाले होते.
यादरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी उपोषण स्थळाला भेट देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.