मुंबई : मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरामध्ये कार्यरत असलेल्या मेट्रो - २ ए आणि मेट्रो - ७ या मेट्रोरेल आता दहिसर (पूर्व) ते डी. एन. नगर अंधेरी (पश्चिम) पर्यंत विस्तारीत करण्यात येत आहे. तसेच मेट्रो - ७ या सेवेचा विस्तार गुंदवली - अंधेरी (पूर्व) पर्यंत करण्यात येत आहे. या अनुषंगाने उपरोक्त रेलसेवांच्या स्थानकांदरम्यान सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बससेवांव्यतिरिक्त काही नवीन बसमार्ग २० जानेवारी २०२३ पासून सुरु करण्यात येत आहेत.
अतिरिक्त बससेवा उपलब्ध : या बसमार्गांद्वारे मेट्रोरेलने प्रवास करणा-या प्रवाशांना अतिरिक्त बससेवा उपलब्ध होईल. मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरातील दहिसर (पूर्व) येथून डी. एन. नगर अंधेरी (प) आणि गुंदवली- अंधेरी (पूर्व) दरम्यान अनुक्रमे प्रवर्तित होणा-या मेट्रो-२-ए आणि मेट्रो-७ या मेट्रोरेल सेवांचा लाभ घेऊ इच्छिणा-या प्रवाशांनी उपरोक्त नवीन बसमार्गांची नोंद घेऊन मेट्रोरेल स्थानकादरम्यान प्रवासाकरीता या बससेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हे आहेत नवीन बसमार्ग : मेट्रो-२ ए मार्गावर बसमार्ग क्र. ए.-२९५ - हा बसमार्ग शांती आश्रम आणि चारकोप दरम्यान एक्सर, बोरीवली मेट्रोरेल स्थानक, गोराई आगार, चारकोप, पहाडी एक्सर मेट्रोरेल स्थानक मार्गे वर्तुळाकार सेवेत प्रवर्तित होईल. शांती आश्रम येथून पहिली बस सकाळी ७ वाजता तर शेवटची बस २२.३० वाजता सुटणार आहे.
मेट्रो-७ मार्गावर बसमार्ग क्र.ए-२८३ : हा बसमार्ग दिंडोशी बसस्थानक येथून मेट्रो- 9 वरील दिंडोशी, कुरार, आकुर्ली मेट्रोरेल स्थानक मार्गे दामूनगर (विस्तारीत) पर्यत प्रवर्तित होईल. दिंडोशी बसस्थानक व दामूनगर (विस्तारीत) येथून ही बस सुटेल. पहिली बस दिंडोशी बसस्थानक येथून सकाळी ६.३० वाजता तर दामूनगर येथून ७ वाजता सुटेल. दिंडोशी बसस्थानक येथून रात्री १० वाजता तर दामूनगर येथून २२.३० वाजता सुटेल.
मेट्रो-२ ए व मेट्रो-७ मार्गावर बसमार्ग क्र.ए-२१६ :हा बसमार्ग एन.एल. कॉम्प्लेक्स / सरस्वती संकुल येथून मेट्रो-२ ए व मेट्रो-७ च्या - दहिसर (पूर्व) मेट्रोरेल स्थानक मार्गे मेट्रो-७ च्या ओवरीपाडा, राष्ट्रीय उद्यान मेट्रोरेल स्थानक मार्गे बोरीवली स्थानक (पूर्व) पर्यंत प्रवर्तित होईल. बोरीवली स्थानक (पूर्व) येथून सकाळी ६.३० वाजता व सरस्वती संकुल येथून सकाळी ७ वाजता पहिली बस सुटेल. शेवटची बस २२.३० वाजता सुटेल.
हेही वाचा : Hyderabad Nizam Death : मुकर्रम जाहच्या मृत्यूने हैदराबादच्या निजाम युगाचा अंत!