मुंबई - कोरोनाच्या संकटात बेस्ट कामगार अत्यावश्यक सेवा देण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. पण या कामगारांच्या जीवाची कोणाला काळजी नाही. सुरक्षेसाठी मास्क, हातमोजे, सॅनिटायझरची मागणी करुनदेखील ते दिले जात नाही. बसेस सॅनिटायझर केल्या जात असल्याचा फक्त देखावा केला जात आहे. कामगारांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार प्रशासन करत असल्याचा गंभीर आरोप बेस्ट कामगार नेते शशांक राव यांनी केला आहे.
शशांक राव यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात ते म्हणतात, बेस्ट कामगार कोणत्या परिस्थितीत काम करतो, याचे कोणालाही काही पडलेले नाही. त्यांच्या सुरक्षेचा विचार केला जात नाही, हे दुदैव आहे. मुंबईच्या जनतेला आणि अत्यावश्यक सेवा देण्यासाठी बेस्ट कामगार जोखीम उचलत आहे. 14 मार्चपासून आम्ही बेस्ट आयुक्त, पालिका आयुक्त, मुख्यमंत्री यांच्याकडे मास्क, ग्लोज, सॅनिटायझर मिळावे यासाठी वारंवार मागणी करत आहेत. मात्र आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही.'
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. बेस्ट कामगारांची दखल घेतली जात नाही. बसेस सॅनिटायझर केल्या जाण्याचा फक्त देखावा केला जात आहे. अशा भयानक परिस्थितीतीत बेस्ट कामगार सेवा देत आहेत. प्रशासन बेस्ट कामगारांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करत असल्याचा, गंभीर आरोप राव यांनी केला आहे.
दोन दिवसापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ 20 हजार मास्क दिले आहेत. ते मास्क आम्ही कामगारांपर्यत पोहचवणार आहोत. हे सर्व प्रशासनाने करणे आवश्यक होते. बेस्ट कामगार हे पालिकेचे कामगार आहेत. केंद्र सरकारने मुंबई महानगरपालिकेला आणि बेस्ट कामगारांना दिलेला 50 लाखांचा विमा अजूनपर्यत दिलेला नाही. उलट बेस्ट कामगारांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही राव यांनी केला आहे.
काही कामगारांना गुलामाची वागणूक मिळत आहे. जे कामगार येऊ शकत नाही त्यांना मेमो दिला जात आहे. जे गावी अडकून पडले त्यांना जबरदस्ती रजेचा अर्ज भरायला सांगितला जात आहे. कोणत्या कामगारांनी या धमक्यांना बळी पडू नये. एकाचीही रजा बुडू देणार नाही, असेही राव म्हणाले.
हेही वाचा - कोरोना : लवकरच धारावी पॅटर्न इतरही झोपडपट्ट्यांमध्ये?
हेही वाचा - लॉकडाऊनमुळे आंबेडकरी चळवळीतील गायकावर उपासमारीची वेळ, अनिल पाटणकरांनी केले 'बेस्ट' काम