मुंबई - कोरोनाचा प्रभाव मुंबईसह उपनगरात दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही बेस्ट उपक्रमाद्वारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा दिली आहे. यासाठी बेस्ट कामगारांना 100 टक्के उपस्थितीचे आदेश देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे कोरोनाचा प्रभाव आणखी वाढणार आहे. म्हणून बेस्टमध्ये 100 टक्के उपस्थिती लागू करण्यास आमचा विरोध असल्याची माहिती बेस्ट कामगार क्रांती संघाचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिली. गायकवाड हे मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन सदस्य व कामगार नेतेही आहेत.
मुंबईत गेल्या तीन महिन्यांहुन अधिक काळ कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच मुंबईची सुरक्षा पाहणाऱ्या पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम बेस्ट कर्मचारी करत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मुंबईचा रेड झोन समावेश करण्यात आला आहे. यासोबतच लॉकडाऊनही करण्यात आले आहे. मुंबईमधील अनेक विभाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. अशा ठिकाणी अत्यावश्यक कामासाठी जाणे शक्य नाही, असेही गायकवाड म्हणाले आहेत.
हेही वाचा - एकदिवसीय उच्चांक! राज्यात ६ हजार ३३० कोरोनाबाधितांची नोंद तर, १२५ रुग्णांचा मृत्यू
तसेच बेस्टचे 100 टक्के कामगार उपस्थित राहिल्यास त्यांना बसायला जागा नाही. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवता येणार नाही. बाहेर गेल्यावर कंटेनमेंट झोन असल्याने त्यांना काम करता येणार नाही. त्यामुळे 100 टक्के उपस्थिती कशाला? असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी बेस्ट कामगारांना सुरक्षा राखता यावी, यासाठी कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. पीपीई कीटही देण्यात आले नाही. मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर दिले जात नाही. सकाळी थोडेसे सॅनिटायझर दिले जाते. यानंतर ते दिवसभर वापरण्यास सांगितले जाते. यामुळे कामगारांच्या जीवाला धोका आहे. त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. यामुळे बेस्ट प्रशासन कामगारांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.
आतापर्यंत बेस्टचे कामगार रोटेशन पद्धतीने काम करत आहेत. त्याचपद्धतीने लॉकडाऊन संपेपर्यंत कामगारांना काम करण्यास सांगितल्यास बेस्ट कामगारांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखता येऊ शकतो, असे गायकवाड यांनी सांगितले.