मुंबई: बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे बेमुदत संप सहाव्या दिवशीही सुरूच राहिल्याने मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईतील 20 आगरांमधील भाडेतत्त्वावरील 1 हजार 671 पैकी तब्बल 1 हजार 375 बसेची सेवा बंद आहे. अशा परिस्थितीत मागील 4 दिवसात संप करणाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कंत्राटदार कंपन्यांची शनिवारी बैठक बोलावली होती. त्यामधूनही तोडगा निघाला नाही.
कर्मचारी सेनेचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र: बेस्टच्या कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्याबाबत पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले, की बेस्टच्या कंत्राटी कामगारांचा रोजगार सुरक्षित नसून त्यांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. त्यांना किमान वेतन आणि सोयीसुविधाही मिळत नाहीत. पर्यायी बस व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी बेस्टने स्वमालकीचा पुरेसा बस ताफा वाढवावा. बेस्टला 3 हजार 419 कोटींचा निधी पालिकेने मंजूर केला आहे. मात्र अद्याप बेस्टला निधी देण्यात आलेला नाही. राज्य शासनाच्यावतीने मुंबईकर जनतेचे हित लक्षात घेवून मुंबई महानगरपालिका आयुक्तांना बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीचा बस ताफा वाढवण्याकरता आवश्यक निधीची पुर्तता करण्याचे तातडीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी कामगार सेनेने केली आहे.
एका बसमागे दररोज 5 हजार रुपयांचा दंड: बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भाडेतत्त्वावर बस पुरवणाऱ्या पुरवठादार संस्थांशी बेस्ट प्रशासनाची चर्चा चालू आहे. बेस्टच्या प्रशासनाने बेस्ट भवनमध्ये कंत्राटदारांसोबत बैठक केली. संपाचा प्रश्न लवकर निकालात निघावा, यासाठी बेस्ट प्रशासनदेखील प्रयत्नशील आहे. बेस्ट प्रशासन थेट कंत्राटी कामगारांची बोलू शकत नाही. पण तोडगा काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. बेस्ट उपक्रमाच्या कामगारांकडून कंत्राटी बस चालवण्याचा प्रयत्न करत केला जात आहे. कंत्राटदारांच्या संस्थेशी बेस्टने करार केला आहे. यानुसार एका बसमागे दररोज 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. बेमुदत संपामुळे बेस्टच्या बस जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे त्या व्यतिरिक्त इतरही दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.
मुंबईकरांच्या मदतीला लालपरी तत्पर: कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने बेस्टने एसटी महामंडळाकडे जादा बस सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार बेस्टच्या 6 आगारांना प्रत्येकी 25 याप्रमाणे 150 बसेस एसटी महामंडळाने पुरवल्या आहेत. बेस्टची वाहतूक सुरळीत होईपर्यंत या बस प्रवाशांना सेवा देतील. जेणेकरून प्रवाशांना इच्छित ठिकाणी पोहोचण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा-