मुंबई - इतर आजार असताना कोरोना विषाणूची लागण झाल्यास रुग्णाला जास्त जोखीम असते. अशा रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र, याला अपवाद ठरत बेस्ट बसच्या एका वाहकाने (कंडक्टर) कोरोनावर मात केली आहे. या वाहकाला अस्थमाचा त्रास होता. आता हा वाहक कोरोनामुक्त झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बेस्ट उपक्रमाकडून मिळालेल्या माहितीनूसार, गोरेगाव डेपोमध्ये काम करणाऱ्या आणि मीरा रोड येथे वास्तव्यास असलेल्या वाहकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 13 एप्रिलला तांबे रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. अस्थमाचा त्रास असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन उपचार करण्यात आले. अखेर या वाहकाने कोरोनाला हरवले आहे. मंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमात आत्तापर्यंत 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे.