मुंबई- मागील काळात जीएसटी आणि नोटबंदीनंतर मरगळलेला रिअल इस्टेट उद्योग आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामुळे ऊर्जितावस्थेत येईल. त्यादृष्टीनेच परवडणारी घरे आणि गृह उद्योगासाठी आवश्यक गृहकर्जाच्या सवलतीमुळे बांधकाम क्षेत्राला निश्चितपणे उभारी मिळेल, असा विश्वास रियल इस्टेट तज्ज्ञ अनुज पुरी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
पुढे अनुज पुरी सांगतात, की आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांकडे लक्ष दिल्याचे दिसते. अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडून येतील, अशी अपेक्षा आहे. मागील काळात रिअल इस्टेट क्षेत्रावर असलेले मंदीचे मळभ देखील दूर होईल. आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या घरांच्या माध्यमातून निश्चितपणे गोरगरिबांना याचा लाभ होईल आणि बांधकाम उद्योगालाही यानिमित्ताने चांगले दिवस येतील. मोठ्या प्रमाणात रेल्वे विमानतळ आणि रस्ते यासारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर ती गुंतवणूक झाल्याने देशाच्या विकास दरामध्ये भर पडेल आणि १० टक्के विकासदराचे ध्येय निश्चितपणे देश गाठेल, असा विश्वास अनुज पुरी यांनी व्यक्त केला.