मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाबाहेर हिमालय पूल कोसळून दुर्घटना झाली होती. याप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाई, मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता संदीप कळकुटे, कार्यकारी अभियंता अनिल पाटील, निवृत्त मुख्य अभियंता शीतलाप्रसाद कोरी या चार जणांना मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येकी 50 हजारांचा जामीन मंजूर केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होत आहे. या सुनावणी दरम्यान मुंबई पोलिसांकडून दावा करण्यात आला होता की, या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट गंभीरपणे झाले नव्हते. मात्र, मुंबई पोलिसांनी स्ट्रक्चर ऑडिट संदर्भातील नकाशे सादर केलेले नव्हते. त्यामुळे आरोपींना याचा फायदा मिळाला.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: एबीव्हीपीचा कार्यकर्ता दिल्ली पोलिसांच्या ताफ्यात; जाणून घ्या 'व्हायरल' सत्य
पुलाच्या सुशोभिकरणाचे काम हे मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येते, असा दावा ऑडिटर नीरज देसाईच्या वकिलांनी केला. जो पूल पडला त्या पुलावर अतिरिक्त ग्रॅनाईट लाद्या बसवण्यात आल्यामुळे पुलाचे वजन वाढले होते. 14 मार्च 2019 ला हिमालय पूल पडल्यामुळे या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता आणि 33 लोक गंभीररीत्या जखमी झाले होते. या संदर्भात मुंबई पोलिसांकडून 709 पानांचे 83 साक्षीदार असलेले आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.