मुंबई - कोरोनापासून बचावासाठी ‘होम क्वॉरेन्टाईन' आणि 'हॉस्पिटल क्वॉरेन्टाईन’ हे दोनच पर्याय सध्या उपलब्ध आहेत. हॉस्पिटल क्वॉरेन्टाईन होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेने ‘होम क्वॉरेन्टाईन’ व्हावे. स्वत:चे आणि कुटुंबाचे संरक्षण करावे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. जे घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, असा इशाराही त्यांनी दिला.
काही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. भाजीबाजारातील गर्दीमुळे कोरोना घरात पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गाव गुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाज विघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. कोरोना संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - शब-ए-बारात अन् आंबेडकर जयंतीला घरी राहून प्रार्थना करा, शरद पवारांचे आवाहन
राज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खासगी डॉक्टरांनी त्यांची रुग्णालये सुरू ठेवली आहेत. मात्र, ज्यांनी रुग्णालये अजूनही सुरू केलेले नाहीत त्याचीही नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे पवार यांनी सांगितले.
राज्यात अन्न-धान्याचा, खाद्य तेलाचा, दुध, भाजीपाल्याचा, औषधांचा आणि इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये. दिल्लीतील ‘मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करू नये. त्याला परवानगीही दिली जाणार नाही, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले. आज राज्यात रामनवमी भक्तीभावाने, साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यापुढेही सर्व सण, उत्सव साधेपणानं साजरे व्हावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.