मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. प्रगत देशात कोरोना व्हायरसमुळे हजारो बळी जात आहेत. त्यामुळे आपल्याला काही होणार नाही या भ्रमात राहू नका. पोलिसांना सहकार्य करुन सरकारच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला केले आहे.
हेही वाचा- कोरोनाचा फटका: राज्यातील स्थायी व इतर समित्यांच्या निवडणुकांना सरकारची स्थगिती
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 दिवसाचे लॉकडाऊन का जाहीर केले? हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवे. कोरोनाचा संसर्ग असेल तर या दिवसात त्या व्यक्तीची लक्षणे समजणार आहे. त्यामुळे या लॉकडाऊनची शिस्त पाळली पाहिजे. नाहीतर आपल्याला फार मोठे परिणाम भोगावे लागतील, अशी भीतीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
जगात 5 लाख 9 हजार 64 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 24 तासात 46 हजार 484 जणांना कोरोनाची लागण झाली. तर याच २४ तासात अडीच हजार मृत्यूमुखी पडले आहेत. दुर्दैवाने हे आकडे आपल्याला ऐकायची वेळ आली आहे. भारतात 724 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 75 नव्या केसेस आहेत. तर आतापर्यंत 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 24 तासात 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आपण याबाबत गंभीर आहोत का? याचा अभ्यास करायला हवा.
कोरोनाचे संकट टाळायचे असेल, त्याचा बिमोड करायचा असेल, तर घरातच रहा. काही लोक रिलॅक्स होण्यासाठी बाहेर विनाकारण फिरत आहेत. मात्र, पुढचे 14 दिवस आपल्यासाठी गंभीर आहेत. त्यामुळे प्रत्येकाने घरातच रहायला हवे. घराबाहेर पडायचे टाळा. घरात बसणे हेच पुढारपण आहे. कोरोना व्हायरस घालवण्यासाठी सर्व सूचनांचे पालन करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.