मुंबई - महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकींसाठी मतदान झाले असून आता विधानसभेची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. झोपडपट्टी धारकांना ५०० फुटांचे घर देण्याची घोषणा काँग्रेसने केली असून भाजपने बीडीडी चाळींवर लक्ष केंद्रीत केले आहे. बीडीडी चाळींच्या राहिवाशांना ५०० फुटांचे घर देण्यात येणार असून पुढील तीन महिन्यात विकास कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती, मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिली आहे.
मुंबईतल्या वरळी, ना .म .जोशी मार्ग आणि नायगाव इथल्या बीडीडी चाळींच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागत असून यात काही जण मुद्दामहुन अडथळा आणत असल्याचे निदर्शनाला आले आहे. मात्र, अडथळा आणणाऱ्यांवर अध्यादेश काढून कारवाई करणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. बीडीडी चाळींच्या विकासाला सुरुवात झाल्या नंतर पुढील ३० महिन्यात रहिवाशी स्वतःच्या घरात राहायला जातील, असा विश्वासही त्यांनी वर्तवला आहे.