मुंबई Bawankule On Jarange Patil: मराठा आरक्षणाचा तिढा राज्यात सर्वदूर पसरलेला असताना याबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. यामध्ये मराठ्यांना न्यायालयात टिकणारं आरक्षण दिलं जाईल. त्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्नशील असल्याचं सांगत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. (Maratha Reservation)
शिवरायांना साक्षी ठेवून संकल्प: याप्रसंगी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिवरायांना साक्षी ठेवून त्यांनी संकल्प केलाय. यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संपूर्ण विधानमंडळ, मंत्रिमंडळ त्यांच्या पाठीशी आहे. यापूर्वी मराठा समाजाला फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं; मात्र उद्धव ठाकरेंच्या सरकारनं ते घालवलं. त्यांना ते आरक्षण टिकवता आलं नाही. सर्वोच्च न्यायालयात हवे तसे वकील त्यांना देता आले नाहीत; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे न्यायालयात टिकणारं आरक्षण ते दिल्याशिवाय राहणार नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले.
सरकारला वेळ द्यावा: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज पेटून उठला असून अनेक ठिकाणी राज्यात जाळपोळ व तोडफोडीच्या घटना सुरू आहेत. नेत्यांना, मंत्र्यांना राज्यात अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, माझी सर्व आंदोलनकर्त्यांना विनंती आहे. राज्यातील १३ कोटी जनता, सर्व पक्ष, आमदार आणि खासदार हे मराठा आरक्षणासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिलचं पाहिजे या मताचे हे सर्वजण आहेत. मग अशात कोणाचा विरोध असेल तर घर पेटवलं, गाडी अडवली हे मान्य; परंतु कोणाचाच विरोध नसताना घर पेटवणं, गाडी अडवणं हे योग्य नाही. यासाठी जेवढा वेळ सरकारला पाहिजे तेवढा जरांगे पाटलांनी सरकारला दिला पाहिजे. जे आपल्या समर्थनात आहेत त्यांच्यावर हल्ले नको. मुख्यमंत्री आव्हान करत असतील तर त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
चित्रलेखा माने यांचा पक्षप्रवेश: याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीच्या कार्यकर्त्या चित्रलेखा माने यांनी २५ हजार कार्यकर्त्यांसह आज भाजपात पक्षात प्रवेश केला. पश्चिम महाराष्ट्र, सातारा, कोल्हापूर, सोलापूर इथे केंद्रातील मोदी सरकार आहेत. येथे राज्य सरकारकडून ज्या योजना येतात त्या पोहोचविण्याकरिता त्या काम करतील असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा: