मुंबई - शिवजयंती उत्सवावर राज्य सरकारकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात काढलेले परिपत्रक रद्द करावे व सर्व अटी मागे घ्याव्या, अशी मागणी करत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली.
राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. सद्यस्थितीत आम्ही शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी केली असती. पण सरकारला निवडणुका, पक्षाचे मेळावे, परिसंवाद यात्रा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना केलेली गर्दी चालते. राज्यातील चित्रपटगृहेदेखील पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहेत. मग शिवाजी महाराजांची जयंती का चालत नाही?, असा, सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. राज्य सरकारने शिवजयंतीवर घातलेल्या निर्बंधांचा निषेध करत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली आली. औरंगजेब सोडून गेला मात्र, त्याचे विचार जिवंत आहे, असे वाक्य बॅनरवर लिहिण्यात आले आहे.
औरंगजेबाच्या विचारांवर चालणारे सरकार
महाविकास आघाडी सरकारला पक्षांचे मेळावे चालतात. त्यात हजारोंच्या संख्येने गर्दी केली तर चालते. पुतळ्याचं अनावरण करताना केलेली गर्दी चालते. मग शिवजयंतीलाच का निर्बंध घातले जात आहे? हे सरकार औरंगजेबाच्या विचारांवर चालणारे सरकार आहे का? असा सवाल मराठा समन्वयक अंकुश कदम यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही शिवजयंती पूर्ण उत्साहात साजरी करणार आहोत. राज्य सरकारला जी काही कारवाई करायची असेल ती कारवाई करा, असा इशाराही कदम यांनी दिला.