मुंबई : सीबीआयने मुंबईतील वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालकांविरुद्ध दोन बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल दोन स्वतंत्र एफआयआर (FIR) दाखल केले आहेत. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कंपनीचे दोन संचालक किरण मेहता आणि कैलाश अग्रवाल यांच्यासह अन्य दोन अज्ञात लोकांविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एकूण 388.17 कोटी रुपयांची फसवणूक : दोन्ही बँकेच्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये तक्रारदार ही बँक असून तक्रारदार बँकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पहिल्या प्रकरणामध्ये 269 कोटी रुपयांची फसवणूक आणि दुसऱ्या प्रकरणात 118 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत स्पष्ट करण्यात आलं आहे. एकूण 388.17 कोटी रुपयांची फसवणूक वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडने केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल : सीबीआयने आज दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीवर सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआयने दिलेल्या अधिक माहितीनुसार, वरुण इंडस्ट्रीजवर या बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला आहे. बँकांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करून वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
होल्डिंग कंपनीच्या खात्यात पैसे हस्तांतरित : या कंपनीचे बँक खाते नॉन परफॉर्मन्स असेट्स (एनपीए) झाल्यानंतर पीएनबी बँकेला 63 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. कंपनीने पीएनबीकडून कर्ज घेऊन 8 कोटी रुपये मॉरिशसमधील सहाय्यक कंपनीला हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. वरुण इंडस्ट्रीजची दुसरी कंपनी ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेसशी संलग्न असलेल्या ट्रायमॅक्स डेटासेंटर सर्व्हिसेसने 2014 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रकडून 29 कोटीचे कर्ज घेतले होते. नंतर कंपनीने अनेकांना पैसे हस्तांतरित केले होते. त्यानंतर कंपनीनं इतर अनेक बँक खात्यांमधून पैसे काढले आणि राउटिंग सेलद्वारे होल्डिंग कंपनीच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले.
'हा' आहे आरोप : अशा स्थितीत 2018 मध्ये कंपनीचं खाते एनपीए झालं. ट्रायमॅक्स आयटीने 190 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून त्याचा गैरवापर केला आणि नंतर बँक खाते 2017 मध्ये एनपीए झाल्याचा आरोप आहे. चौकशीनंतर सीबीआयने वरुण इंडस्ट्रीजविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा: