मुंबई - कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला होता. आता कुठेतरी कांद्याला भाव मिळत असताना केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादली. यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकार जोपर्यंत निर्यातबंदी हटवणार नाही, तोपर्यंत केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांसोबत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.
कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. ग्राहक नसल्यामुळे तो माल घरी पडून राहिला होता. त्यानंतर महापूर, चक्रीवादळ आणि आता आलेले अतिवृष्टीचे संकट या सर्वांना शेतकरी तोंड देतो आहे. राज्यात जितकी या शेतकऱ्यांना मदत करता येईल, तितका प्रयत्नही आम्ही सरकार म्हणून करत आहे. परंतु, दुर्दैवाने या मदतीला केंद्र सरकारची साथ मिळत नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
मध्यंतरी केंद्र सरकारने दूध भुकटीच्या आयातीच्या संदर्भात काही कारण नसताना निर्णय घेतला. आज हजारो टन दूध भुकटी महाराष्ट्रात आणि देशात पडून आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा अडचणीचा ठरला. दूध भुकटीबाबत केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे दुधाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यातच आता कांद्याचे थोडे पैसे शेतकऱ्यांना मिळतील, अशी वेळ आली असताना त्यावर केंद्र सरकारने निर्यातबंदी आणून त्यावर घाला घातला केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव खाली आले. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे, असे थोरात म्हणाले.
हेही वाचा- 'कोरोना काळातील मोदींची आश्वासने म्हणजे खयाली पुलाव'
शेतकऱ्यांच्या मनामध्ये केंद्र सरकारच्या या निर्णयाने एक मोठी चीड निर्माण झाली आहे. या अन्यायाच्या विरोधात ही चीड आहे, त्यामुळे काँग्रेस या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. जोपर्यंत केंद्रसरकार निर्यात बंदी हटवणार नाही, तोपर्यंत आम्ही शेतकऱ्याच्या सोबत हे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशाराही बाळासाहेब थोरात यांनी दिला. शेतकऱ्यांसोबत राहण्यासाठी आज आम्ही राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात आंदोलन सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.