मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात चांदीवाल आयोगाकडून वारंट जारी करण्यात आले आहे. हे वारंट बेलेबल वारंट आहे. चांदीवाल आयोगाकडून 50 हजार रुपयांचे बेलेबल वारंट जारी करण्यात आले आहे. तसेच आयोगाने महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांना आदेश दिले आहेत की, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची हे वारंट देण्यासाठी नियुक्ती करावी.
याअगोदर देखील परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगाने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, सिंह काही चौकशीला हजर राहिले नाहीत. जेव्हा आयोगाकडून शेवटची सुनावणी झाली तेव्हा आयोगानं कठोर भूमिका घेतली आणि सांगितले होते की, जर पुढील सुनावणीला सिंह हजर झाले नाहीत तर त्यांच्या विरोधात वारंट जारी करण्यात येईल. आज सिंह यांना चांदीवाल आयोगासमोर हजर राहायचे होते. मात्र, ते हजर राहिले नाहीत. त्यानुसार त्यांच्या वारंटची कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - आयएएस-आयपीएस अधिकारी आधी फडणवीसांची भेट घेतात, त्यानंतर मंत्र्यांवर आरोप केले जातात!
परमबीर सिंह यांचे अनिल देशमुख यांच्यावर आरोप -
मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे प्रकरणात बदलीच्या कारवाईनंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिले होते. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूलीचे आरोप लावले होते. उच्च न्यायालयात याप्रकरणी एक याचिका दाखल झाली होती. त्यानुसार सीबीआयद्वारे चौकशीचे आदेशदेखील देण्यात आले होते. राज्य सरकारनेही सेवानिवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची समांतर चौकशी करते आहे.