मुंबई : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा वसई, विरार येथे दिनांक १८ व १९ मार्च २०२३ रोजी एक कार्यक्रम होणार आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला राज्य सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य आहे, अंधश्रद्धेला आपल्या राज्यात स्थान नाही, महाराष्ट्रानेही तसा कायदा केला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या महाराजाला राज्यात कार्यक्रमाला परवानगी नाकारावी, संत तुकाराम महाराजांचा अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या वसई-विरार येथील कार्यक्रमाला परवानगी दिल्यास लोकांची दिशाभूल करून त्यांच्या भावनेशी सरकारने खेळू नये, असे पटोले यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री - श्री संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारले, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी देतो, असे संत तुकाराम महाराज यांनी त्या व्यक्तीला सांगितले, असे वादग्रस्त विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात वाद झाला होता. यावर धीरेंद्र शास्त्री यांनी माफीदेखील मागितली होती.
धीरेंद्र शास्त्री आणि सनातन - यानंतर संत तुकारामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र कृष्ण शास्त्रीही चर्चेत आले होते. याप्रकरणी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफीही मागितली होती. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (वय 26) हे भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची भाषा सातत्याने करत आहेत. आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. तेव्हा ते म्हणाले की, सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. जेव्हापासून आम्ही सनातन धर्मासाठी घरवापसीचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हापासून आमच्याविरोधात षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
कार्यक्रमाला परवानगी देऊ नये : फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात नाना पटोले यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना अंधश्रद्धा पसरवणारे म्हटले असून संत तुकारामांवर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख केला आहे. मुंबईला लागून असलेल्या मीरा-भाईंदर परिसरात होणाऱ्या धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याबाबत काँग्रेसने या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी राज्य सरकारकडे मागणी केली आहे.
नागपूर पोलिसांकडून क्लीन चिट : काही दिवसापूर्वी बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमध्ये एक कार्यक्रम केला होता. तेव्हा त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप केला होता. तसेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी त्यांची जादू दाखवल्यास तीस लांखाचे बक्षिस देण्याची घोषणा श्यामा मानव यांनी केली होती. अंधश्रद्धा, चमत्काराच्या नावाखाली लोकांना शास्त्री मूर्ख बनवत असल्याचे श्याम मानव यांचा आरोप आहे. त्याविरोधात अंधश्रद्धा पसरवल्याप्रकरणी नागपूर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, नागपूर पोलिसांनी चौकशी नंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना क्लीन चिट दिली होती.
...तर जनता कशी सुरक्षित असेल : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या प्रकरणात जयसिंघांनी यांच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर असुन सत्य बाहेर आले पाहिजे. परंतु राज्याचे गृहमंत्रीच असुरक्षित असेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित राहणार? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जयसिंघानी यांच्यावर केला होता. त्यांना एक कोटी रुपयाची ऑफर देल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले होते. फडणवीस त्या संबंधित परिवाराशी जुने संबंध असून फडणवीस मुख्यमंत्री असतानापासूनचे त्यांचे संबंध आहेत. सत्तेत असताना व सत्तेत नसतानाही फडणवीस यांच्या कुटुंबाचा संबंध होता, असे खुद्द फडणवीसच सांगत आहेत. यामागे काही राजकीय नेते, पोलीस अधिकारीही असल्याचा त्यांचा आरोप आहे.