मुंबई - कोरोनाच्या रुग्णांवर आता आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या औषधे उपचारासाठी वापरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आयुष टास्क फोर्सच्या चमूने बिकेसी येथील कोविड सेंटरला आज पहिल्यांदा भेट दिली. यावेळी आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या नियमावलीनुसार औषधांचे वाटप करण्यात आले.
बिकेसीतील कोविड रुग्णालयात 500 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी जवळपास २०० रुग्णांना सौम्य लक्षणे आहे. त्यांना मंगळवारपासून ही औषधे दिली जाणार आहेत. यामध्ये संशमनी वटी, आयुष काढा, च्यवनप्राश यांचा समावेश आहे. या औषधांमुळे कोरोना रुग्णांची लक्षण कमी होण्यास मदत मिळेल. ही तिन्ही औषधं एकत्रितपणे काम करणार आहे. त्यामुळे रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यास मदत करतील, असा विश्वास आयुष टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केला.
या औषधांबाबत सकारात्मक असून उद्यापासून कोरोना रुग्णांवर हे उपचार करणार आहोत. याची जबाबदारी कोविड रुग्णालयात नेमण्यात आलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दिली जाईल. 15 दिवसांनी हे औषध दिलेल्या व न दिलेल्या रुग्णांचा निरीक्षण केले जाईल, असे बिकेसी येथील कोविड रुग्णालयाचे डिन डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले.