मुंबई - मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत सुमारे 3,537 झाडे तोडण्याचे तर त्यापैकी 1900 झाडांचे पुनर्रोपण करण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यापैकी कोस्टल रोडसह महालक्ष्मी स्पोर्टस क्लब येथील तरण तलावाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत 22 पैकी 16 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून 800 झाडे कापण्यास मंजुरी मिळाल्याचे वृक्ष प्राधिकरणातील अधिकाऱ्याने सांगितले.
वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत सुमारे 3,537 झाडे तोडण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यात सत्ताधारी शिवसेना व मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामात अडथळा ठरणारी 373, महालक्ष्मी स्पोर्टस ग्राऊंड येथील तरण तलावात अडथळा ठरणारी 16, भांडुप येथील रेल्वेवरील नाला रुंदीकरणात अडथळा ठरणारी 115, वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्बांधकामात अडथळा ठरणारी 625 झाडे कापण्याचे तर 1900 झाडांचे पुनर्रोपण करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
कोस्टल रोडच्या कामात अडथळा ठरवारी एकूण 215, महालक्ष्मी स्पोर्टस ग्राऊंड येथील तरण तलावात अडथळा ठरणारी 16, भांडुप येथील नाले रुंदीकरणात 115, वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात अडथळा ठरणारी 625 यांसह विविध कामांत अडथळा ठरणाऱ्या झाडे कापण्याचे प्रस्ताव नॉट टेकन करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तर कोस्टल रोडच्या कामात अडथळा ठरणाऱ्या 158 झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 1900 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.