मुंबई Dawood Ibrahim Properties : शुक्रवारी (५ जानेवारी) दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील चार मालमत्तांचा लिलाव पूर्ण झाला. दोन मालमत्तेसाठी अनुक्रमे 2.01 कोटी आणि 3.28 लाखांची यशस्वी बोली लावण्यात आली. इतर दोन मालमत्तांची विक्री झाली नाही. 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमच्या या चार मालमत्तांचा लिलाव, चर्चगेट येथील आयकर भवनात केला गेला.
रत्नागिरीतील मूळ गावाच्या जमिनीचा लिलाव : केंद्र सरकारनं रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबके या दाऊदच्या मूळगावी असलेल्या चार भूखंडांचा लिलाव करण्याचे आदेश दिले होते. दाऊदची एकूण 21,275 चौरस मीटर एवढी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील मुंबके हे गाव 67 वर्षीय दाऊदचं जन्मस्थान आहे. येथे त्यानं 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत येण्यापूर्वी आपलं बालपण घालवलं होतं.
लिलावात कोण सहभागी झालं : नवी मुंबईत राहणारे भगवान चेतलानी यांनी या लिलावात बोली लावली. तर 2020 च्या लिलावात रत्नागिरीतली दाऊदची आंब्याची बाग खरेदी करणारे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज देखील आजच्या लिलावात सामील झाले होते. मात्र, सील टेंडर द्वारे दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी या लिलावात बाजी मारली आहे. अजय श्रीवास्तव यांनी 2020 च्या लिलावात दाऊदचा रत्नागिरीतील बंगला खरेदी केला होता.
इतक्या कोटींची बोली : आज पार पडलेल्या लिलावात सात जण सामील झाले होते. रत्नागिरीतील शेत जमीन सीए 003 साठी चार जणांनी बोली लावली. यामध्ये वकील अजय श्रीवास्तव यांनी 2 कोटी 1 लाख रुपयांना सर्वाधिक बोली लावली. दाऊदची रत्नागिरीतील दुसरी शेतजमीन, सीए 0004 साठी तीन जणांनी बोली लावली. या जमिनीची मूळ किंमत 1 लाख 56 हजार 270 इतकी असून ही जमीन देखील वकील अजय श्रीवास्तव यांनी 3 लाख 28 हजार रुपयांची बोली लावून खरेदी केली.
याआधी झालेले दाऊदच्या मालमत्तेचे लिलाव : सर्वप्रथम, आयकर विभागानं 2000 मध्ये दाऊदच्या 11 मालमत्तांचा लिलाव केला होता. मात्र त्यावेळी लिलाव प्रक्रियेत कोणीही आलं नाही. मात्र गेल्या काही वर्षांत दाऊदच्या बऱ्याच मालमत्ता विकून त्याचा ताबा खरेदीदारांना देण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. 2018 मध्ये दाऊदचं नागपाडा येथील हॉटेल, गेस्ट हाऊस आणि एक इमारत विकण्यात आली. तसेच दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या दक्षिण मुंबईतील फ्लॅटचा लिलाव करण्यातही तपास यंत्रणेला यश आलं आहे.
हे वाचलंत का :