मुंबई - गेले तीन दिवस मुंबई शहरामध्ये पडलेल्या बेसुमार पावसामुळे झोपडपट्टी व चाळीत राहणाऱ्या लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने प्रत्येक कुटुंबाला तातडीने १० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
कालच मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी पावसाच्या संदर्भात बोलताना हे एक छोटे वादळ असल्याचे म्हटले. अवघ्या 12 तासांत मुंबईमध्ये 294 मिमी एवढा पाऊस झाला. याचाच अर्थ ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट असणारे नागरिक तसेच चाळींमधील निम्न-मध्यमवर्गीय अशा सर्वच लोकांना रोजगारापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही स्वरूपाची आर्थिक बचत शिल्लक राहिलेली नाही. अशा काळामध्ये हे अतिवृष्टीचे संकट आल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी सर्वसामान्य माणसाची स्थिती झाली आहे. त्यामुळे जशी नैसर्गिक आपत्तीच्यावेळी मदत दिली जाते तशी मदत आताही करण्याची मागणी आमदार भातखळकर यांनी केली.
कोरोना महामारीमध्ये राज्य सरकारने नागरिकांना एका दमडीचीही मदत केली नाही. शिधावाटप दुकानांवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे धान्यदेखील मिळालेले नाही. या सर्व बाबी लक्षात घेता या नैसर्गिक आपत्तीनंतर सरकारने नुकसानीचे सर्वेक्षण करावे, अशीही मागणी अतुल भातखळकर यांनी केली. गेल्यावर्षी सरकारने अवकाळी पावसानंतर सर्वेक्षण करण्याचे आदेश काढले होते. आताही वस्तीनुसार सर्वेक्षण करण्याचे आदेश काढण्यात यावेत आणि घरामागे १० हजार रुपयांची मदत द्यावी, असे भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे.
कोरोनाच्या संपूर्ण कालखंडामध्ये उपनगरीय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची एकही बैठक आतापर्यंत झालेली नाही. या एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतर तरी उपनगरीय जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना उपनगरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे आदेश द्यावेत. प्रत्यक्ष बैठकीमुळे संसर्ग होण्याची भीती त्यांना वाटत असेल तर किमान दृक-श्राव्य माध्यमातून तरी बैठक घ्या, असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.