मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेदरम्यान मुंबई उपनगर जिल्ह्यात भरारी पथकामार्फत एकूण ९.५४ कोटी रुपयांची रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ५ हजार १२७ अनधिकृत फलक हटविण्यात आले असून चार तक्रारीही पोलिसात दाखल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
राज्यात लागू असलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत भरारी पथकामार्फत जप्त करण्यात आलेल्या रकमेमध्ये ४ ऑक्टोबर रोजी डी. एन. नगर पोलीस चौकीच्या हद्दीतून २५ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.
तसेच यापूर्वी ३ ऑक्टोबरला वर्सोवा येथून ७४.६४ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर रोजी बोरिवली येथून ७.५० कोटींचे सोने चांदी, जवाहिर आदी जप्त करण्यात आले. २८ सप्टेंबर रोजी गोरेगाव येथून ४.६५ लाख रुपये तर कांदिवली येथून एक कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
या ठिकाणी झाले गुन्हे दाखल -
आचारसंहिता कालावधीत कुरार, विलेपार्ले आणि घाटकोपर येथे पोलिसांनी महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याअंतर्गत तीन गुन्हे दाखल केले आहेत. तसेच मालाड पोलिसांनी एका गाडीतून अवैध मद्यसाठा जप्त केला असून वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
५ हजार बॅनर काढले -
निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीमध्ये निवडणूक यंत्रणेच्या भरारी पथकातर्फे अद्यापपर्यंत सार्वजनिक मालमत्तेवरील ४ हजार ८०४ तर खाजगी मालमत्तेवरील ३२३ असे एकूण ५ हजार १२७ फलक , पोस्टर्स, बॅनर व झेंडे काढून टाकण्यात आले आहेत.
हेही वाचा - आरेचा प्रश्न हा फक्त मेट्रोचा नाही, तर बिल्डर लॉबीचा - प्रकाश आंबेडकर
हेही वाचा - हरिभाऊ राठोड यांची तत्काळ हकालपट्टी करा, काँग्रेस ओबीसी विभागाची मागणी