मुंबई - देवेंद्र फडणवीसांनी 'वारिस पठाण प्रकरणावरुन' महाविकासआघाडीतील नेत्यांबाबत अतिशय बेजबाबदारपणाचे वक्तव्य केले आहे. वारिस पठाण यांनी कर्नाटकमध्ये वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. त्यामुळे फडणवीसांनी याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना प्रश्न विचारावेत, असा सल्ला कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी फडणवीसांना दिला आहे.
माजी आमदार वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लीम तणाव वाढवणारे वक्तव्य केले. शिवसेनेने आणि सरकारमधील नेत्यांनी मौन का धारण केले? शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावरच्या भाषणात केले होते. त्याला काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी उत्तर दिले.
हेही वाचा - फडणवीसांनी प्रश्न विचारताच अजित पवार आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावले
हा प्रकार कर्नाटकात झाला होता. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्रीच फडणवीसांना याचे उत्तर देऊ शकतात. त्यांना याबाबत प्रश्न विचारावेत. दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाह देखील गप्पच आहेत. फडणवीसांनी त्यांनाही प्रश्न विचारावेत असे, शेख म्हणाले.
दरम्यान, शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करुन फडणवीसांना उत्तर दिले आहे.