मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या स्थगितीनंतर हे आरक्षण आणि त्यावर दिलेली स्थगिती उठवण्यासाठी तसेच न्यायालयीन बाजू कशी मांडता येईल, यासाठी आज (रविवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत सरकारकडून लवकरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांसोबत लवकरच बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी या बैठकीनंतर दिली.
आज झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, आदी. नेते आणि सर्व विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सरकार तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आम्ही विरोधात असतानाही आम्ही या आरक्षणाच्या बाजूने होतो. आरक्षणाच्या संदर्भात आम्ही विरोधी पक्षासोबत चर्चा करणार आहोत. आम्ही यात कोणतेही राजकारण करणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन हा विषय सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
यावेळी राज्यभरातील परिस्थिती समजून घेण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भात आज राज्यात अनेक ठिकाणी बैठका झाल्या. त्या सगळ्या शांततेत पार पडल्या. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही, त्याबद्दल जनतेचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, आणि आम्ही ते मिळवून देणार आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले.
चव्हण म्हणाले, सरकार हे आरक्षणासाठी मराठा समाजासोबत आहे. सत्तेत बसल्यानंतर आम्ही एकमताने ठराव पारित केला आणि या कायद्याला समर्थन दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर काही नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर कायदेशीर बाबींना तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही नेत्यांशी चर्चा केली जाईल. सगळ्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेऊ. कायदेशीर सल्ला घेण्यात आला आणि इतर मुख्यमंत्र्यांनी सगळे समजून घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात रिटपेटीशनचा विषय निश्चितच आहे. फडणवीस आल्यानंतर त्यांच्याशीदेखील चर्चा करुनच पुढचा निर्णय घ्यायचा, असे मुख्यमंत्र्याची भूमिका असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
आम्हाला राजकीय वाद करायचा नाही. हा राजकारणाचा हा विषय नाही. हा कोणत्या एका पक्षाचा विचार नाही. सकल मराठा समाजाला सगळ्यांचे समर्थन आहे. आम्ही सगळे एकत्र होतो. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका पूर्वीपासून होती आणि आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण हा निर्णय घेतला असल्याचेही चव्हाण म्हणाले.