मुंबई : माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्यातील इतर निवडणुका पाहता या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर मागच्या काळात मध्य प्रदेशने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केल्याने त्याचा फार मोठा गवगवा केला होता. त्या पद्धतीने आता त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सुद्धा वीज बिल माफ करायला हवे.
शेतकऱ्यांसाठी असलेले अश्रू हे मगरीचे : बुधवारी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल समोर आल्यानंतर राज्यात काय परिस्थिती आहे हे सर्वांना समजले आहे. राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आहे. त्यात हा निवडणूकीच्या तोंडावर होणारा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे यात घोषणाचा पाऊस होणार आहे. बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना विरोधकांचे शेतकऱ्यांसाठी असलेले अश्रू हे मगरीचे असल्याचे सांगितले होते. त्यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, आज बजेट सादर केल्यानंतर समजेल की कोणाचे अश्रू मगरीचे आहेत ते.
सरकारचे अजिबात लक्ष नाही: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात होणाऱ्या ७५ हजार नोकर भरती बाबत या बजेट मध्ये स्पष्टता आली पाहिजे. पेट्रोल, डिझेल दर कमी झाले पाहिजेत. राज्यसरकार कर्जाच्या व्याजापोटी कोटी रुपये खर्च करत आहे. बुधवारी आर्थिक पाहणी अहवाल पहिला. शेती उद्योग मागे पडला आहे. अनेक क्षेत्रात महाराष्ट्र मागे पडत चालला असून सरकारने त्या दृष्टीने त्याला गती देण्यास प्रयत्न करायला पाहिजेत. बुधवारी रात्री तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून घेतली. परंतु या बाबींकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही आहे. अगोदरच सरकारच्या डोक्यावर इतका कर्जाचा बोजा असताना कर्ज वाढवून महागाई वाढविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी दिली पाहिजे. शेतकऱ्यांना भरीव मदत दिली पाहिजे. रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे. असेही नाना पटोले म्हणाले.